लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. अशातच शिंदे गटातील धुसफूस समोर आली आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार गजानन कीर्तिकर यांचं वय झालं आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर उभे राहिले नाहीत, तर सिद्धेश कदम उमेदवारी मागतील, असं विधान शिवसेना ( शिंदे गट ) नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं होतं. याला गजानन कीर्तिकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“एका घरात दोन भावांना तिकीट देता येते का? तिकीट द्यायचं पक्षानं ठरवलं, तर मी विरोध करणार,” असा इशारा गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधत होते.
“सिद्धेश कदम यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय झाला नाही”
“गेल्या दहा वर्षात उत्तर-पश्चिम मतदारसंघात काम केलं आहे. ही जागा पुन्हा निवडून आणायची आहे. त्यामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय मी घेतला आहे. सिद्धेश कदम यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय झाला नाही. येणाऱ्या निवडणुकीत साडेतीन लाखांहून अधिक मतांनी निवडून येऊ शकतो,” असा विश्वास गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केला.
“पक्षाला मला तिकीट द्यायचं नसेल, तर…”
“उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात १०० कोटींची विकासकामे केली आहेत. पक्षात काही माणसं आली असून नेतृत्व करत आहेत. त्यांचे काही छुपे अजेंडे असू शकतात. सिद्धेश कदमसाठी रामदास कदम बोलले. पण, एकाच घरात दोन भावांना तिकीट देता येते का? पक्षानं तिकीट द्यायचं ठरवलं, तर मी विरोध करणार आहे. पक्षाला मला तिकीट द्यायचं नसेल, तर कुठल्यातरी चांगल्या व्यक्तीला द्यावे,” असेही गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं.
“संघटना बांधणीसाठी पुढाकार घेतला होता, पण…”
“रामदास कदमांनी स्वत:चा मुलगा निवडणूक लढणार हे जाहीर करण्यापेक्षा आनंदराव अडसूळ किंवा त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांच्याबद्दल का बोलत नाहीत? पक्षासमोर अनेक पर्याय आहेत. मी ३६ विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. त्याचा अहवालही सादर केला. तो अहवाल काय केला? मी संघटना बांधणीसाठी पुढाकार घेतला होता. पण, संघटना बांधणीसाठी संधी मिळत नाही,” अशी खंतही गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली.