Shiv Sena Demands Resignation Of Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमेटले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी नुकताच वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. महायुतीतील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेतेही धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्याव अशी मागणी करत आहेत. अशात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी खासदार गजानन किर्तीकर यांनीही आता या प्रकरणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
बहीण-भावावरील जनतेचा विश्वास उडाला
संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत बोलताना गजानन किर्तीकर म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी असा गुंड पोसला कशाला. याचबरोबर पंकजा मुंडे यांची कार्यपद्धती शोभणारी नाही. त्या भागातील जनतेचा या दोन्ही बहीण-भावावरील विश्वास उडालेला आहे. नैतिकता म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी त्यागपत्र द्यावे, तरच त्यांना पुढील राजकीय वाटचाल करताना अडचण येणार नाही.” टीव्ही ९ मराठीशी बोलताना गजानन किर्तीकर यांनी ही मागणी केली आहे.
गजानन किर्तीकर हे शिवसेनेकडून चार वेळा आणि वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार म्हणून विजयी झाले आहेत. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले होते. अमोल किर्तीकर यांनी शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) यंदाची लोकसभा निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यामध्ये ते पराभूत झाले होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येला २५ दिवस पूर्ण
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. देशमुख यांच्या हत्येला २५ दिवस होऊनही अद्याप सर्व मारेकऱ्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील आमदारांसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी हा मुद्दा लावून धरला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार बजरंग सोनावणे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता.