शिवसेना खासदार गजानन किर्तीकर मागील काही दिवसांपासून द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानात आणि शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, ती चूक पुन्हा नको, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर किर्तीकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होते. त्यात आता गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली आहे.
या भेटीवर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. “चार दिवसांपूर्वी गजानन किर्तीकर माझ्याकडे आले होते. मराठी माणसाला नोकरी देण्यासाठी गजानन किर्तीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची साथ सोडत, भाजपाबरोबर युती करावी. बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधातील भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडावी. गजानन किर्तीकर शिंदे गटात आले, तर त्यांचं स्वागत आहे,” असेही रामदास कदम यांनी म्हटलं.
ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद केले आहेत. त्यावर रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकडीमुळे असं होत राहणार. आता तरी उद्धव ठाकरेंनी यातून शिकावे आणि त्यांना बाजूला करता आले तर करावे. प्रतिज्ञापत्र बाद झाल्याने एकनाथ शिंदे यांचा ‘धनुष्यबाण’ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे,” असेही रामदास कदम यांनी सांगितलं.