मुखाने हरिनामाचा गजर, टाळमृदंगाच्या तालात विविध संतांचे अभंगगायन करीत टाळकरी, ध्वजधारी वारकऱ्यांसह शेगावच्या संतश्रेष्ठ गजाननमहाराजांची पालखी रविवारी सकाळी ७ वाजता शहरात दाखल झाली. मोठय़ा भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष रेविता बनसोडे यांनी शहरात पालखी दाखल होताच पालिकेच्या वतीने पालखीची पूजा करून वारकऱ्यांचे स्वागत केले.  
तालुक्यातील उपळा (मा.) येथून रविवारी पहाटे ५ वाजता संत गजाननमहाराजांच्या पालखीचे उस्मानाबादकडे प्रस्थान झाले. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास ही पालखी शहरात दाखल झाली. पालखीचे शहरात आगमन होताच तेरणा महाविद्यालय येथे शहरवासीयांच्या वतीने शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष रेविता बनसोडे यांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. ज्ञानेश्वर मंदिर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा न्यायालय, छत्रपती शिवाजीमहाराज चौक, देशपांडे स्टँड, नेहरू चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफीस माग्रे ही पालखी मुक्कामासाठी शहरातील लेडीज क्लबच्या मदानावर दाखल झाली. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात पालखी आल्यानंतर जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. रंगनाथ लोमटे यांनी स्वागत करून वारीतील वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ व पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात आले.
 शहरात पालखी येणार असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने पालखीच्या मार्गावर स्वच्छता करून रस्त्याच्या दुतर्फा जंतुनाशक पावडरची फवारणी केली होती. सायंकाळी लेडीज क्लबच्या मदानावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत िदडीतील वारकऱ्यांचे भजन, कीर्तन, हरिनामाचा जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. सोमवारी ही पालखी वडगावकडे (सि.) मार्गस्थ होत आहे.