स्वस्तात २ किलो सोने देण्याच्या आमिषाने कोल्हापूरमधील व्यावसायिकांना लुटण्याचा प्रयत्न नगर तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. बुरुडगाव रेल्वेरुळाजवळ आज, मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मात्र या घटनेतील लूटमारीचा प्रयत्न करणारे तिघे पसार झाले.
यासंदर्भात संजय तुकाराम पाटील (मालसौड, करवीर, कोल्हापूर) यांनी नगर तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोर मोहाटे (रा. अमरावती) याच्यासह एक अनोळखी पुरुष व महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील मोरे करत आहेत. बुरुडगाव रेल्वेरुळाजवळ यापूर्वी स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूटमार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
अमित वरुटे कोल्हापूरमधील व्यावसायिक आहेत. संजय पाटील हा त्यांचा नातेवाईक व गाडीवर चालक आहे. किशोर मोहाटे हा काही काळ कोल्हापूरमध्ये एका कंपनीत चालक म्हणून नोकरीला होता. तेथे त्याची व पाटील याची ओळख झालेली होती. माझ्या ओळखीच्या नगरमधील एका कुंभाराला दोन किलो सोने सापडले आहे. तुम्हाला स्वस्तात ते मिळवून देतो, असे मोहाटे वरुटे व पाटीलला सारखे सांगत होता. अमित वरुटे, पाटील व त्यांचा आणखी एक नातेवाईक शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. आज नगरमार्गे ते परत जात होते.
नगरमध्ये आलो आहोत तर स्वस्तात सोने देणा-या मोहाटेची भेट घेऊन जाऊ, या विचाराने पाटीलने त्याला मोबाइल केला. मोहाटेने तिघांना बुरुडगावच्या रेल्वेरुळाजवळ मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास बोलवले. त्याच वेळी सहायक निरीक्षक चव्हाण व त्यांचे सहकारी गस्तीसाठी वडगाव गुप्ता गावाकडे जात होते. त्यांना निर्जन भागात बोलेरो जीप उभी दिसली, या भागात स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लूटमार केली जाते, तरी येथे कोल्हापूरची गाडी कशी या प्रश्नामुळे चव्हाण यांना संशय आला. त्यांनी पायपीट करत चौकशी सुरू केली. सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्यांना रुळावर दोघे उभे दिसले. हे दोघे सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होते.
नंतर त्यांनी सोने खरेदीसाठी आल्याचे व एक सहकारी (वरुटे) सोन्याची खात्री करण्यासाठी काटवनात गेल्याची माहिती दिली. चव्हाण यांनी प्रसंगाचा गांभीर्य त्यांना सांगून लगेच वरुटेला बोलावून घेण्यास सांगितले. पाटीलने त्याला मोबाइल केला, तेव्हा वरुटेला मोहाटे व इतर दोघे (त्यात एक महिला) पिशवीतील बनावट सोन्याच्या अंगठय़ा दाखवत होते. पाटीलने पोलीस आले आहेत, लगेच निघून ये असे कळवताच स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवणारे पळून गेले. मात्र वरुटे बचावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा