सोलापूर : ‘गणपती बप्पा मोरया’ गजरात, लेझीम, झांज खेळांसह ढोलताशांचा दणदणाट, गुलाल, फुलांची मुक्त उधळण अशा उत्साही वातावरणात सोलापुरात लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले. शहर व परिसरात सुमारे १ हजार ४५० सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

काल मंगळवारी सायंकाळपासून गणपतीच्या मूर्तीच्या खरेदीचा उत्साह बाजारपेठांमध्ये दिसत होता. बुधवारी गणेश चतुर्थीला सकाळपासूनच टिळक चौक, मधला मारूती परिसरासह सर्व बाजारपेठांमध्ये श्रीच्या मूर्ती खरेदी करून धार्मिक आणि उत्साही वातावरणात आबालवृध्द नागरिक घराकडे जात होते. सुमारे दीड लाख घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दुसरीकडे सार्वजनिक मंडळांच्या श्री प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांनी सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. टिळक चौक, कोंतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, अशोक चौक, रविवार पेठ, विजापूर रोड, होटगी रोड, जुळे सोलापूर आदी भागात श्रीच्या मूर्ती खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली होती. सार्वजनिक मंडळांच्या श्री प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांना प्रामुख्याने चार हुतात्मा पुतळे, समाचार चौक, हाजीमाई चौक, दत्त चौक आदी भागातून सुरूवात झाली. १९८५ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या माणिक चौकातील मानाच्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी विधिपूर्वक करण्यात आली. पत्रा तालीम येथे लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मंडळाच्या पणजोबा गणपतीसह पूर्व भागातील ताता गणपती तसेच थोरला मंगळवेढा तालीम मंडळासह पाणीवेस तालीम, कसबा गणपती, चौत्रा पुणे नाका मंडळ आदी प्रमुख गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्या.

मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापनेची मिरवणूक चार हुतात्मा पुतळय़ांपासून निघाली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते या मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी लेझीम पथकाचा मर्दानी खेळ पाहून आयुक्त शिवशंकर यांचेही पाय थिरकले आणि त्यांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. भाजपचे आमदार विजय देशमुख, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद थोबडे आदींनीही कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीत सहभागी होऊन लेझीम खेळाचे डाव सादर केले. तर जुळे सोलापुरात इंडियन मॉडेल शाळेच्या श्री प्रतिष्ठापना मिरवणुकीत सहभागी झालेले भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही लेझीम खेळाचा आनंद लुटला. याच मिरवणुकीत ढोलताशांच्या पथकात पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनाही ढोल वाजविण्याचा मोह आवरला नाही. मुरारजी पेठेतील राजेश कोठे गणेशोत्सव मंडळासह पूर्व भागातील गणेश प्रतिष्ठान आदी मंडळांच्या मिरवणुकांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Story img Loader