‘जोवर गांधी घराण्यातील व्यक्तींपासून काँग्रेसला फायदा आहे, तोवर आम्ही त्यांनाच नेते मानू,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी गुरुवारी व्यक्त केले. अनेक राज्यांमध्ये भाजपचे अस्तित्त्वही नसल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होणार असल्याचे आपल्याला मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या निवडणुकीत ‘मोदी विरुद्ध राहुल गांधी’ असा सामना होणार आहे काय, हा प्रश्नच योग्य नसल्याचे नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात अय्यर म्हणाले, ह्लतामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, अरुणाचलसह संपूर्ण ईशान्य भारतात भाजपचे अस्तित्त्व नाही. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये चौरंगी लढत होणार आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे अस्तित्त्व लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकते का ते पाहावे लागेल. फक्त चार-पाच राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत होईल. २०१४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार बनू शकते, मात्र काँग्रेसला बहुधा २७२ जागा मिळणार नाहीत. त्यामुळे आम्ही कुणासोबत जायचे, आघाडी सरकारचे नेतृत्व कोण करणार हे त्यावेळी ठरेल.ह्व त्याआधीच हे कसे ठरवणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.
भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल, असे अलीकडे झालेल्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष आहेत, याकडे लक्ष वेधले असता अय्यर म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला बहुमतासाठी १०० ते १२० जागांची गरज भासेल. ती ते कशी पूर्ण करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये खूप मोठी घट होईल असे कुठल्याही सर्वेक्षणात म्हटलेले नाही. निवडणुकीनंतर अनेक राज्यांत राज्यस्तरीय पक्ष पुढे येतील व मग कोण कुणाशी युती करणार हे ठरेल. मला स्वत:ला कुठेही मोदी लाट दिसत नाही. प्रसारमाध्यमे वर्णन करत असल्याप्रमाणे मोदी हे वादळ नव्हे, तर ती केवळ सायंकाळची झुळूक आहे. ज्या मोदींचे नेतृत्व राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील इतर पक्षांनाच नव्हे, तर भाजपमधीलही अनेकांना मान्य नाही, त्या मोदींशी मुकाबल्याचा आम्ही विचार का करावा? मोदी हे गरगर फिरून पडणाऱ्या भोवऱ्याप्रमाणे आहेत.
आता प्रियंका गांधींना निवडणूक प्रचारात उतरवण्याची मागणी होत आहे. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे होत आली तरी काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही असा आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात मणिशंकर अय्यर यांनी सांगितले,‘ गांधी घराण्याव्यतिरिक्तचे (उदा. नरसिंहराव, सीताराम केसरी) नेते आम्हाला मिळाले, तेव्हा काँग्रेसची अवस्था वाईट झाली. गांधी घराणे हे आमचे सगळ्यात मोठे ‘अॅसेट’ आहे. जोवर आम्हाला या घराण्यातील लोकांपासून फायदा आहे, तोवर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ. मात्र, त्यांच्यामुळे नुकसान झाले, तरी आम्ही त्यांना सोडणार नाही.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा