राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे आमदार बबनराव पाचपुते यांना आपला पक्षांतर्गत विरोध कायमच राहील असे स्पष्ट संकेत खासदार दिलीप गांधी यांनी दिले आहेत. पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावर ‘शाईफेक’ आंदोलन केले जाईल, असे गांधी यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी जाहीर केले होते, त्यासंदर्भात बोलताना खा. गांधी यांनी सुवेंद्र तरुण रक्ताचे नेतृत्व आहे, असे सांगत समर्थन केले.
पाचपुते यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास गांधी यांचा विरोध होता, त्यासंदर्भात गांधी यांना विचारणा केली असता गांधी म्हणाले, वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतल्याने त्याच्याशी आपण सहमत आहोत. पाचपुते यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वी वरिष्ठांनी आपल्याला विचारले होते. मात्र महाराष्ट्र व नगर जिल्ह्य़ातील राजकारण हे वेगळे मुद्दे आहेत असे सांगत गांधी यांनी दिलेले उदाहरण, पाचपुते पक्षात आले तरी त्यांना पक्षांतर्गत विरोध कायमच राहील, हेच स्पष्ट करणारे आहे.
हे उदाहरण देताना गांधी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांनंतर चांगला पाऊस झाला. ज्या तलावात अनेक वर्षे पाणी येत नव्हते त्या तलावांनाही आता चांगले पाणी आले आहे. त्यामुळे या तलावांचा अनेक जण उपयोग करून घेऊ लागले आहेत. याचा अर्थ पाचपुते यांना पक्षांतर्गत विरोध कायम राहील का, या प्रश्नावर गांधी यांनी केवळ स्मित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा