Nitin Gadkari PM Offer : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं नाव सतत पंतप्रधान पदासाठी चर्चेत असतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या समर्थकांनी नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्या, त्यांना निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाने दिली होती, अशी मोठी माहिती समोर येत आहे. याबाबत त्यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
नितीन गडकरी यांना विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. ही ऑफर कोणी दिली होती? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “आजच नाही तर, मला खूप लोकांनी अशी ऑफर दिली आहे. माध्यमांतही अशी चर्चा होत असते. मी ज्या संदर्भात या ऑफरविषयी सांगितलं होतं की, आपल्या देशाची समस्या विचार भिन्नता नसून विचार शुन्यता आहे. मी पत्रकारांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात हे सांगितलं होतं. मी आणीबाणीनंतर राजकारणात आलो आहे. मी माझ्या विचारधारेशी कधीच तडजोड करणार नाही. त्यामुळे पंतप्रधान पदाची ऑफर मला जेव्हा दिली तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही मला का पंतप्रधान बनवू इच्छिता? पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाहीय. अशा ऑफर मला निवडणुकी आधी आणि नंतरही आल्या. पण त्यांच्या ऑफरवर विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मी माझ्या विचारधारेशी तडजोड करत नाही.
हेही वाचा >> Nitin Gadkari : “राजकीय पक्षासारखं काम करणं बंद करा”; नितीन गडकरींनी ‘भारतीय रोड काँग्रेस’ला सुनावलं!
मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही
तसंच, तुम्हाला शरद पवारांनी, उद्धव ठाकरेंनी, सोनिया गांधींनी कोणी ऑफर दिली होती? तुमचे सर्वपक्षीय संबंध आहेत, त्यामुळे कोणी ऑफर दिली? केंद्रातील नेत्याने ऑफर दिली होती की राज्यातील नेत्याने ऑफर दिली होती? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “मी चौकात उभा नाहीय. ऑफर कोणी दिली हे सांगणं उचित नाही. मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीय. तुम्ही कितीही विचारलंत तरीही मी सांगणार नाही. मी कधी कोणाकडे काही मागायला गेलो नाही. मी आहे त्यात मला समाधान आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर तुम्हाला प्रमोशन मिळेल का? असं विचारलं असता ते म्हणाले, “मी आरएसएसचा स्वयंसेवक आहे. तुम्ही मोदीजींना प्रश्न विचारू शकता, पण माझे आणि पंतप्रधान मोदींचे नाते खूप चांगले आहे.”