लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमुळे व्यंगचित्रं ही सर्वसामान्यांच्या तशी परिचयाचीच झाली आहेत. चित्र आणि शब्दांचा वापर करीत व्यंगचित्रं ही आजूबाजूच्या घटना-घडामोडींवर भाष्य करतात. ती पाहून आपण हसतो आणि पुढे जातो. पण त्यांच्यातील बारकावे आणि सौंदर्यस्थळे ही आपल्या नजरेतून सुटतात. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यंगचित्रांकडे पाहाण्याची आपली दृष्टी आपल्याकडे नसते. नेमकी हीच दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न प्रसिद्ध चित्रकार प्रा. गणेश बोबडे (नागपूर) आणि व्यंगचित्रांचे संग्राहक-अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी एका अनोख्या दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे केला.

नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने ‘व्यंगचित्रकलेतील विनोद आणि चित्रकला’या विषयावर या दोन्ही मान्यवरांनी निवडक व्यंगचित्रांच्या आधारे भाष्य केले. नॉर्मन थेलवेल, अँद्रे फ्रान्स्वा, ब्रूस वॉकर या परदेशी आणि आर.के. लक्ष्मण, सुधीर दर, आणि वसंत सरवटे या भारतातील नामवंत व्यंगचित्रकारांच्यासह इतर नामांकित मंडळींच्या प्रत्येकी एक व्यंगचित्राच्या सहाय्याने त्यांनी आपले विवेचन सादर केले. या दोघांनी व्यंगचित्रांकडे कसे पहायचे एवढेच सांगितले नाही, तर व्यंगचित्रांमध्ये काय पहायचे हे देखील उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या प्रयत्नाला धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्र साक्षरता असे समर्पक नाव दिले.

प्रा. बोबडे यांनी शास्त्रोक्त संगीतात जशी घराणी असतात तशी व्यंगचित्रकलेत रेषांची देखील घराणी असतात ही बाब नमूद केली. कोणी रेषांचा मुबलक वापर करतो तर कोणी सूचक वापर करतो. कोणी रंगाच्या आधारे व्यंगचित्र फुलवतो तर कोणी परिणामकारकता साधण्यासाठी रंगाचा वापर टाळतो. काहींच्या व्यंगचित्रांमध्ये तपशीलांची रेलचेल असते तर काही ते टाळतात. असे अनेक बारकावे त्यांनी या वेळी उलगडून दाखविले. विविध व्यंगचित्रांमध्ये माणसे आणि प्राणी यांचे हावभाव कसे अचूक टिपले आहेत हे त्यांनी दाखवून दिले. यासाठी चित्रकाराला शरीरशास्त्राची उत्तम जाण हवी ही बाब प्रा. बोबडे यांनी अधोरेखित केली.

या वेळी बोलताना धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्रांकडे समाज केवळ करमणुकीचे साधन पाहातो अशी खंत व्यक्त केली. त्यांनी हसविलेच पाहिजे असा आग्रह धरणे हा व्यंगचित्रकलेवर आणि व्यंगचित्रकारावर अन्याय करणे होय असे त्यांनी ठामपणे सांगितले. उलट ती पाहिल्यावर आपण विचारात पडलो पाहिजे असे ते म्हणाले. चांगले व्यंगचित्र कोणते हे कसे ठरवायचे याबद्दल देखील श्री. धर्मापुरीकर यांनी चर्चा केली. शारीरिक व्यंगांची थट्टा करणाऱ्या व्यंगचित्राला चांगले म्हणता येत नाही आणि जे परिणामकारता साधते तेच उत्तम व्यंगचित्र होय असे त्यांनी सांगितले. उत्तम व्यंगचित्रकार हा मूलतः एक चांगला कथाकार असतो कारण त्याला त्याच्या कलाकृतीतून काहीतरी सांगायचे असते ही बाब देखील त्यांनी यावेळी नोंदविली.

सादरीकरणात दाखविलेल्या प्रत्येक व्यंगचित्रांमधून सकृतदर्शी जे दिसते त्यापेक्षा वेगळा आणि खोल असा अर्थ दोन्ही मान्यवरांनी उलगडून दाखविला. आपण आणि प्रा. बोबडे हे कधीकाळी व्यंगचित्र काढत असू पण देशातील आणि परदेशातील उत्तम व्यंगचित्र पाहिल्यानंतर आपला हा प्रांत नाही हे दोघांच्याही लक्षात आले आणि दोघांनीही तो नाद सोडला अशी मिश्किल टिप्पण्णी धर्मापुरीकर यांनी यावेळी केली. त्याच बरोबर परदेशात व्यंगचित्रकारांना चांगला मोबदला मिळतो पण आपल्याकडे परिस्थिती विपरीत आहे असे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर परदेशातील व्यंगचित्रकलेच्या तुलनेत आपण किमान शंभर वर्ष मागे आहोत याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. डॉ. श्रीनिवास पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच प्रा. बोबडे आणि धर्मापुरीकर यांचा परिचय करुन दिला. दीपनाथ पत्की यांनी स्वागत केले तर डॉ. अभय दातार यांनी आभार मानले.