सांगली : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या चोर गणपतीचे भाद्रपद प्रतिपदेच्या मुहुर्तावर शनिवारी पहाटे आगमन झाले. या चोर गणपतीचे पाच दिवसांनी ऋषीपंचमी दिवशी विसर्जन केले जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणार्या या चोर गणपतीला २०० वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापना होते.
गणेशचतुर्थीच्या अगोदर चार दिवस या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते. दरवर्षी रंगरगोटीशिवाय मूर्तीना हात लावला जात नाही. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात.
आणखी वाचा-…तरच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी मिळेल; सरकारची नेमकी अट काय?
गणपती मंदिरातील मुख्य गणपतीच्या गर्भगृहाबाहेर दोन्ही बाजूला या प्रकारच्या दोन गणपतींची भाद्रपद शुध्द प्रतिपदेला विधीवत स्थापना होते आणि भाद्रपद शुध्द पंचमीला म्हणजेच ऋषीपंचमीला यांचें विसर्जन विधी झाल्यानंतर या मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्याची परंपरा आहे. चोर गणपतीच्या मुर्त्या सुमारे १५० वर्ष जुन्या आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत.
चोर गणपती गुपचूप येऊन कधी बसतो आणि केव्हा जातो कळतही नाही त्यामुळे याला चोर गणपती म्हटले जाते. विशेष असा इतिहास या गणपतींना नसला तरी चोर गणपती बसल्यावर वातावरण गणेशमय होऊन जाते. संस्थान परंपरेनुसार गणेश चतुर्थीला गणेशदुर्ग मधील दरबार हॉलमध्ये प्रथेनुसार गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना होते. पाचव्या दिवशी विधीवत पारंपारिक पध्दतीने मिरवणुकीने या गणेशाचे कृष्णा नदीत सुर्यास्तावेळी विसर्जन करण्यात येते.