महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आज (१८ सप्टेंबर) सकाळपासूनच लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचं आगमन कालपासूनच सुरू झालं आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा लोकांच्या घरोघरी विराजमान झाला आहे. सार्वजनिक गणेशत्व मंडळांच्या मंडपांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू आहे. कोकणातही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या मूर्ती डोक्यावर घेऊन आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोकणवासी गणेश मूर्ती घरी घेऊन जात आहेत.
गणेश चतुर्थीमुळे सर्वत्र गणेश भक्तांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवामुळे बाजारपेठा फुलल्या आहेत. त्यामुळे खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. मुंबईत दादरच्या फूल बाजारात कालपासून प्रचंड गर्दी झाली आहे. ही गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मोठ्या थाटामाटात लोक गणपती बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करत आहेत. दरम्यान, राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तब्बल १४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात केले आहेत. शहरात गस्तीची ठिकाणं वाढवण्यात आली आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, टेहळणी मनोऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे.
हे ही वाचा >> तुमचा ‘घरचा गणेशा’ होऊद्या व्हायरल! लोकसत्ता.कॉम वर दाखवा भन्नाट सजावट, फोटो कसे कराल शेअर?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईत १९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारची अवजड वाहनं आणि खासगी बस याबाबत वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केलं आहे. त्याअंतर्गत २१, २४, २६ आणि २९ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना आणि खासगी बसेसना प्रवेश करण्यास आणि चालवण्यास पूर्ण निर्बंध असतील. इतर दिवस सर्व अवजड वाहनांना दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर रात्री १२ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत वाहतुकीसाठी मुभा असेल.