गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत राज्यभरातील विविध शहरांमध्ये घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात प्रतिष्ठापित केलेल्या गणपतीचे विविध भागातील तलाव, नद्यांमध्ये उत्साहाने विसर्जन करण्यात आले. मुंबईतील मानाच्या समजल्या जाणा-या लालबागच्या राजाचे आज सकाळी आठच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. मात्र, पुणे, कोल्हापुर शहरांमध्ये अद्याप काही ठिकाणी बाप्पाचे विसर्जन सुरु आहे. सोमवारी शहरात सकाळच्यावेळी पावसाने काही काळ अवकाश घेतला असला तरी विविध जिल्ह्य़ात पावसांची संततधार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसामध्येच बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा सोहळा पार पडला.

फोटो गॅलरी 

गेल्या दहा दिवसांपासून राज्यभरातील वातावरण गणेशमय झाले असताना सोमवारी सकाळपासून गणेश मंडळांमध्ये गणेश विसर्जनाची तयारी करण्यात कार्यकर्ते व्यस्त होते. सजवलेल्या हातगाडय़ांवर, मारुती व्हॅन, जीप, ट्रक आदी वाहनांवर श्री मूर्ती ठेवून तसेच श्रींसमोर ढोल ताशे, बेंजो या वाद्यांबरोबरच डिजेवर मंगलमय गाण्यांच्या सीडी लावून सार्वजनिक व घरगुती श्री विसर्जनाला मिरवणुकीचे स्वरूप आले होते. यावेळी वाद्यांच्या तालावर तरुणी, महिला आणि युवक बेधुंद होऊन नाचताना दिसले.
दरम्यान, राज्यातील काही महत्वाच्या ठिकाणी घातपाती कारवाया होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. राज्य राखीव पोलीस दलांसह इतर अनेक पोलीस दले नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत होते. चोख पोलीस बंदोबस्तात सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तसेच गिरगाव चौपाटी येथे विसर्जना दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील उपस्थित होते. आपल्या आगमनाआधी राज्यभरात समृद्धी नांदावी म्हणून गणरायाने पावसाने जनतेला संतुष्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले.

Story img Loader