दहा दिवसांपासून अनेक विघ्नांना सामोरे जात असून अखेर बुधवारी अकराव्या दिवशी पोलिस बंदोबस्तात विघ्नहर्त्यांच्या विसर्जनाला सुरुवात झाली. रात्री सर्व गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन पार पडले. संवेदनशील गणेश मंडळाची मिरवणूक दुपारी दीड वाजता सुरू होऊन साडे चार वाजता शांततेत मार्गस्थ झाली. मिरवणुकीतील महत्त्वाचा टप्पा पार पडल्याने पोलिस प्रशासनाने काही अंशी सुटकेचा श्वास घेतला.
काल नियोजित विसर्जनाचा कार्यक्रम पोलिस प्रशासन व औदुंबर गणेश उत्सव कृती समितीमध्ये कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे शहरातील सर्व ५६ सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जनाची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत स्थानिक तहसील कार्यालयात समिती व गावातील प्रमुख नेत्यांना चच्रेसाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार सुभाषराव वानखेडे,माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, राजू नजरधने, नितीन माहेश्वरी, नितीन भुतडा, अॅड. संजय जाधव, राजीव खामनेकर, कैलास कदम, रमेश चव्हाण, अॅड. बळीराम मुटकुळे, अजय नरवाडे, पप्पू जयस्वाल, यादवराव मखलेसह गणेश मंडळाचे पदाधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रशासनातर्फे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जानकीराव डाखोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी महाजन, तहसिलदार सचिन शेजाळ यांच्या सह चर्चा होऊन प्रशासनाने आरोपीला अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचे आवाहान केले. या आवाहनाला प्रतिसाद देत तो निर्णय तहसील कार्यालयासमोर बसलेल्या हजारो गणेश भक्तांना सांगितल्याप्रमाणे सकाळपासून विसर्जन मिरवणुकीला शहरात सुरुवात झाली. त्यानुसार सायंकाळपर्यंत शांततेत गणेश विसर्जन प्रक्रिया सुरू होती. दरम्यान तीन दिवसांपासून बंद असलेली बाजारपेठ बुधवारी सकाळी पूर्ववत सुरू झाली.