Ganesh Naik vs Eknath Shinde Thane Fuardian Minister : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड मोठ्या यशामुळे भाजपाचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे भाजपाने गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यातही आक्रमक राजकारण सुरू केलं आहे. राज्य मंत्रिमंडळात भाजपाने गणेश नाईक या ठाणे जिल्ह्यातील एकमेव चेहऱ्याला संधी दिली असून नाईक हे जिल्ह्यावरील स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सोपवण्यात आलं आहे. नाईक यांच्यापाठोपाठ डोंबिवलीतील पक्षाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्ष पद आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले किसन कथोरे यांना ताकद देताना “तुमच्यामागे मुख्यमंत्री उभा आहे” असं जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. दुसऱ्या बाजूला गणेश नाईक हे नवी मुंबईसह ठाण्यात जनता दरबार भरवत आहेत. तसेच पुढील काही महिन्यात ठाण्याच्या विविध भागात जनता दरबार भरवणार असल्याचं त्यांनीच जाहीर केलं आहे. भाजपाचे हे ‘दरबार’ त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी पूरक ठरावेत अशा पद्धतीची योजना आखण्यात आली असली तरी यामागे शिंदे यांची कोंडी करण्याचे राजकारण सुरू आहे का, अशी कुजबूजही सुरू झाली आहे.

दरम्यान, या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी सोमवारी (१ मार्च) भिवंडीत प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी वार्ताहरांनी गणेश नाईक यांना विचारलं की ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरवण्याचा तुमचा मनोदय आहे का? यावर नाईक म्हणाले, “मी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरवणार आहे. पालघर जिल्ह्यात माझा जनता दरबार नुकताच झाला. नवी मुंबईत काल एक आणि या अगोदर एक असे दोन जनता दरबार पार पडले. ठाणे शहरात एक जनता दरबार झाला. ठाण्यातील पुढच्या जनता दरबाराची तारीख जाहीर केली आहे. पालघर व नवी मुंबई शहरात होणाऱ्या जनता दरबारांची तारीख देखील जाहीर केली आहे. इतर तारखा देखील मी जाहीर करणार आहे. ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात मी जाणार आहे. मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, वाडा व तलासरी अशा प्रत्येक तालुक्यात मी जाणार आहे”.

मी १५ वर्षांपासून ठाण्याचा पालकमंत्री : गणेश नाईक

गणेश नाईक म्हणाले, “मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना यापूर्वी देखील सर्व तालुक्यांमध्ये गेलो आहे. या जिल्ह्याचं सर्वाधिक काळ पालकमंत्रिपद भूषवणारा नेता मीच आहे. मी १५ वर्षांपासून या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सांभाळत आहे. गणेश नाईक सोडून इतर कुठल्या नेत्याने हे काम केलेलं नाही आणि भविष्यकाळात देखील दुसरा नेता ठाण्याचा पालकमंत्री होईल की नाही याबाबत मला शंका आहे. शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती घेण्यासाठी केवळ परमेश्वराची कृपा असावी लागते. आता महायुतीचं सरकार आहे. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि आम्ही ३८ मंत्री ताकदीने काम करत आहोत आणि आम्ही सर्वजण मिळून राज्याची प्रगती करू असा विश्वास व्यक्त करतो”.

Story img Loader