गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाईल. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचा उत्साह हा शिगेला पोहचला आहे. बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. अशात वैजापूरमध्ये २५० किमीचा ट्रक प्रवास करुन आलेली गणपती बाप्पाची मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश उत्सव आणि भव्य मूर्तीचं वेगळं नातं

गणेश उत्सव आणि भव्य मूर्तींचं एक वेगळं नातं आहे. साडेअठरा फुटांच्या एका गणेशमूर्तीने थेट २५० किमीचा ट्रक प्रवास केला आहे, ज्याची चर्चा वैजापूरमध्ये रंगली आहे. वैजापूर येथील छत्रपती शासन या ग्रुपने नंदुरबार जिल्ह्यातून गणरायाची भव्य अशी मूर्ती आणली आहे. २५० किलोमीटर ट्रकवर प्रवास करत ही साडेअठरा फूटाची मूर्ती येवला शहरात दाखल होताच सर्वांचे लक्ष वेधले जात होते, तसंच या मूर्तीने २५० किमीचा प्रवास केल्याची चर्चा रंगली आहे.

वैजापूरचा महाराजा असं या गणपतीचं नाव

वैजापूरचा महाराजा असं या छत्रपती शासन मंडळाच्या गणपतीचं नाव आहे. मुंबईत ज्या प्रमाणे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो त्याचप्रमाणे आम्ही इथे गणेश उत्सव साजरा करतो. वैजापूरमध्येही गणेश उत्सवाचा असाच उत्साह दिसून येतो. आमच्या मंडळाचे जे सहा ते सात सदस्य यासाठी मेहनत घेत असतो. नुसता धांगडधिंगा करणं हा आमचा उद्देश नाही. लोकांनी आनंदाने उत्सव साजरा करावा हा आमचा इतकी मोठी मूर्ती आणण्यामागचा उद्देश आहे. खराब रस्ते, वीजेच्या तारा या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत आम्ही साडे अठरा फुटांची ही गणेशमूर्ती शहरात आणली आहे. आमचं तालुक्यांमध्ये, स्वागत होतं आहे आणि त्यामुळे आमचा थकवा दूर झाला आहे. असं छत्रपती शासन मंडळाचे सदस्य अक्षय कुंदे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav 2023 18 feet ganpati idol came in truck from nandurbar to vaijapur scj