Ganesh Utsav 2024: गणेशोत्सव म्हटलं की कोकणात एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि कोकण हे एक वेगळं समीकरण पाहायला मिळतं. आता गणेशोत्सवाच्या काळात अनेक चाकरमानी कोकणात जात-येत असतात. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी लालपरीला म्हणजे एसटीला प्राधान्य दिलं आहे. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह आदी शहरातून जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या ५ दिवसांत पोहोचले आहेत.
तब्बल ५००० पेक्षा जास्त बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम केला आहे. ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे अडीच लाख पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे.
यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली. या बद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, आता १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ३ ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बसेस तैनात ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.