Mumbai Ganesh Visarjan 2024 Live : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईकर, पुणेकर रस्त्यावर येऊन मिरवणूक काढत असतात. मुंबईतली विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरु आहे. लालबागचा राजा आणि इतर गणपती यांची ही मिरवणूक सुरु आहे. मुंबईतल्या गिरगाव, जुहू या चौपाट्यांवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. महाराष्ट्रातही अनंत चतुर्दशी साजरी करण्यात आली. अनेक शहरांमध्ये कृत्रीम तलाव तयार करण्यात आले होते. या तलावांवर जाऊन नागरिकांनी घरगुती गणेशाचं विसर्जन करत पुढच्या वर्षी लवकर या असा गजर केला. आज विसर्जन मिरवणुकीचा दुसरा दिवस आहे. जाणून घेऊ सगळे अपडेट्स
मुंबईत लालबागच्या राजासह गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरुच, पुण्यात मानाच्या गणपतींना निरोप
लालबागचा राजा आता विसर्जनासाठी तराफ्यावर नेण्यात आला आहे. राजाला वाद्यांची शेवटची सलामी दिली जात आहे. थोड्याचवेळात लालबागचा राजा विसर्जनासाठी खोल समुद्रात नेला जाईल.
लालबागच्या राजाची मिरवणूक २० तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. या चौपाटीवर राजासह सगळ्याच गणपतींना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली आहे. गिरगाव चौपाटीवर पाय ठेवायलाही जागा नाही असं चित्र आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अमृता फडणवीस आणि सुपरस्टार आयुष्मान खुराणा हे तिघंही वर्सोवा येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेत या सगळ्यांचा सहभाग असणार आहे.
लालबागचा राजा मंगळवारी सकाळी साधारण ११ वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. त्यानंतर लालबागचा राजा हा लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा प्रवास करुन गिरगाव चौपाटीवर दाखल होतो. यंदा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हे अंतर पार करण्यास तब्बल २० तास लागले.
आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईकर, पुणेकर रस्त्यावर येऊन मिरवणूक काढत असतात. मुंबईतली विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरु आहे. लालबागचा राजा आणि इतर गणपती यांची ही मिरवणूक सुरु आहे.