महापुराच्या संकटानंतर सावरत असलेल्या सांगलीकरांनी कुळाचार म्हणून आज गणेशाचे उत्साहात पण डामडौल टाळत स्वागत केले. तर मिरज शहरात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झांजपथक, बेंजोच्या निनादात गणेशाचे स्वागत केले. मिरज शहरात रात्री उशिरापर्यंत गणेशाच्या स्वागत मिरवणुका सुरू होत्या. सांगली शहरात मात्र डामडौल टाळत मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे स्वागत केले.
महापुरानंतर सांगली शहर सावरत असतानाच गणेशोत्सव आजपासून सुरू झाला. यंदा उत्सवावर महापुराचे सावट दिसत असून अनेक सार्वजनिक मंडळांनी श्रीची प्रतिष्ठापना केली असली तरी मनोरंजन आणि डामडौल टाळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सांगली संस्थानच्या दरबार हॉलमध्ये श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र यावेळी कोणतीही सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली नाही. या वेळी सांगली संस्थानचे विजयसिहराजे पटवर्धन, राजलक्ष्मी पटवर्धन, माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.
मिरज शहरात मात्र अनेक मंडळानी मूर्तीकारांच्या कार्यशाळेपासून मंडळापर्यंत सवाद्य मिरवणुकीने गणेशाचे स्वागत केले. झांजपथक, बेंजोच्या आवाजात श्रींचे स्वागत करण्यात आले. मिरज संस्थानच्या गणेशाचेही पारंपरिक पध्दतीने अब्दागिरीसह पालखीतून शाही मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. किल्ला भागातील माधव मंदिरापासून महाराणा प्रताप चौक, लक्ष्मी मार्केट, शनिवार पेठ माग्रे ही स्वागत मिरवणूक गणेश मंदिरापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत गोपाळराजे पटवर्धन, गंगाधरराव पटवर्धन, बाळराजे पटवर्धन, उमादेवी पटवर्धन आदींसह संस्थानचे मानकरी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. दरम्यान, उत्सवा निमित्त दर वर्षी उभारण्यात येत असलेल्या स्वागत कमानींना यंदा फाटा देण्यात आला आहे. सांगलीतील श्रीराम प्रतिष्ठानने यंदा स्वागत कमान उभारण्याऐवजी त्याच निधीतून पूरग्रस्तांसाठी मोफत श्रींची मूर्ती आणि पूजा साहित्य देण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या या आवाहनास ३ हजार पूरग्रस्तांनी प्रतिसाद देत श्रींच्या मूर्तीची मागणी नोंदविली होती. ती आज पूर्ण करण्यात आल्याचे नगरसेवक शेखर इनामदार यांनी सांगितले.