अलिबाग : मुंबई, ठाण्यातून गणेशभक्त मोठय़ा संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. बुधवारी २७९ सार्वजनिक तर १ लाख १ हजार ६७६ घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असून फळ आणि फुलांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने दरवर्षी मुंबईतील लाखो चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. डोक्यावर उचलून वाजतगाजत गणेशमूर्तीना घरी आणले जाते. घराघरांत मोठय़ा उत्साहाने लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पारंपरिक खालूबाजाचे सूर यानिमित्ताने गावागावांत ऐकायला मिळतात. बाल्या डान्स, भजन, कीर्तन यांचे आयोजन केले जाते. गणपती हा कोकणवासीयांचे आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे कुठे दीड दिवस, कुठे सात दिवस, कुठे दहा दिवस, तर काही ठिकाणी २१ दिवसांसाठी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
जिल्ह्यात एक लाखाहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यात २७९ सार्वजनिक गणेशमूर्तीचा समावेश आहे. गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून चाकरमानी मोठय़ा संख्येने रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठा पूजा साहित्य आणि सजावट साहित्य खरेदीसाठी गजबजून गेल्या होत्या. फुलांच्या आणि फळांच्या किमती वाढल्या होत्या. फळ १०० ते १३० रुपये किलोप्रमाणे तर फुले २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे विकली जात होती. मखर १ हजार ५०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत विकले जात होते. देशी बनावटीच्या लाइटची तोरणे बाजारात आणली होती. ग्राहकांकडून यांना मोठी मागणी होती.
गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर करोनाचे सावट आणि चक्रीवादळाचे संकट होते. त्यामुळे उत्साह नव्हता; पण या वर्षी मात्र गणेशोत्सवावरील निर्बंध दूर झाले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे.