३२ लाखाच्या नकली नोटा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाबा उर्फ प्रकाश जाधव व चार सहकाऱ्यांना पोलिसांनी नाशिक येथे अटक केली असून सव्वा लाखाच्या नकली नोटा व नोटा छापणारी मशिनही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाशी दहशतवादी व अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या शक्यतेने दहशतवादी विरोधी पथकाने आज या प्रकरणाचा आढावा घेतला.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात नकली नोटा चलनात आणणारी टोळी सक्रीय असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी येथील हॉटेल सुशिल्का येथे छापा मारून प्रमोद दत्तात्रय मोहकर (४८, रा. पुणे), अविजीत धर्मराज म्हैसकर (२४, रा. अकोला), प्रकाश चांगदेव वडितके (३४, रा. अहमदनगर) व नागेश प्रभाकर अहिरे या चौघांना अटक केली होती. या चौघांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा मास्टर माईंड नाशिक येथे असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारावर चंद्रपूर पोलीस दलाच्या पथकाने नाशिक येथे छापा मारून मास्टर माईंड बाबा उर्फ प्रकाश जाधव व त्याचा सहकारी राजेश दांडेकर याला अटक केली. या दोघांजवळून सव्वा लाखाच्या नकली नोटा व नोटा तयार करणारी मशिन जप्त केली. त्याच वेळी गडचिरोली जिल्ह्य़ातही नकली नोटा चलणात आणणाऱ्या श्रीदीप मुजूमदार व जुगलराम या दोघांना अटक केली. या चारही जणांना आज चंद्रपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. नक्षलवादी व नकली नोटा यांचा संबंध नसल्याचे गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी आज लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. बहुतांश आरोपी नाशिक व पुण्यातील असल्याने ही बाब अधिक स्पष्टपणे समोर आली आहे.