लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : नकली विवाह लावून देत नवरदेवाची लुबाडणूक करणाऱ्या सहाजणांच्या टोळीला तोतया नवरदेव उभा करून पकडण्यात आले. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे ही कारवाई झाली. ही टोळी ठाणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरातील आहे.
या टोळीतील नवरी म्हणून पुढे करण्यात आलेल्या पिंकी अशोक ढवळे (वय २५, रा. मलंग रोड, कल्याण, जि. ठाणे) व तिची आई म्हणून ओळख करून दिलेली लता धनराज चव्हाण (वय ४५, रा. डोंबिवली, ठाणे) यांच्यासह महिला एजंट लता नवनाथ पदक (वय ४५, रा. राजुरा, छत्रपती संभाजीनगर), निर्मला पृथ्वीराज बावीस्कर (वय ५६, रा. उल्हासनगर, कॕम्प नं. ४, जि. ठाणे), तिची भाची विशाखा श्रीकृष्ण छापाणी (वय २५, रा. नया अकोला, अमरावती), तिचा मेव्हणा श्रीकृष्ण (पूर्ण नाव समजले नाही) अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. यातील चौघीजणी अटकेत असून विशाखा छापाणी आणि श्रीकृष्ण यांचा शोध मोहोळ पोलीस घेत आहेत.
आणखी वाचा-सोलापुरात रोहिणीचा पहिलाच २५ मिमी पाऊस; वादळाने वृक्ष कोसळले; फळबागांसह घरांचेही नुकसान
समाजात मुलींचा जन्मदर घटत चालल्यामुळे अनेक लग्नाळू तरूणांचे विवाह होत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊन लग्न लावून देण्याचे आमीष दाखवून लाखो रूपये उकळण्याचे आणि नंतर लुबाडणुकीचे प्रकार वाढत आहेत. मोहोळ तालुक्यातील देगाव वाळूज येथील सचिन विष्णू भोसले (वय ३०) या लग्नाळू तरूणासाठी वधू संशोधन सुरू होते. परंतु मुलगी मिळत नव्हती. त्याच्या मावस भावाच्या ओळखीने लग्न जुळविणारा गंगाधर लाडबा ढेरे (रा. भोकर, जि. नांदेड) याच्या संपर्कातून एका मुलीचे स्थळ सुचविण्यात आले. या मुलीबरोबर लग्न करण्याचे निश्चित झाल्यास मुलीच्या कुटुंबीयांना अडीच लाख रूपये रोख, ११ हजार रूपये प्रवास भाडे असे मिळून दोन लाख ६१ हजार रूपये द्यावे लागतील, अशी अट नवरदेवाकडील मंडळींना घालण्यात आली.
त्याप्रमाणे सर्व रक्कम मुलीकडील मंडळींना दिल्यानंतर २ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर मुलाच्या गावी देगाव वाळूज येथे घरगुती स्वरूपात लग्न पार पडले. त्यानंतर नवरीचा कथित भावजी शैलेश याने १० एप्रिल रोजी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असल्याची सबब पुढे करून नवरदेव सचिन व नवरीसह त्यांच्या कुटुंबीयांना अमरावती येथे बोलावून घेतले. परंतु तेथे पोहोचाल्यानंतर नवरी आणि तिचा कथित भावजी दोघे अचानकपणे हुलकावणी देऊन बेपत्ता झाले.
आणखी वाचा-भुजबळांच्या ‘त्या’ विधानाला फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “भाजपा सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे जास्त…”
अखेर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून आले. दरम्यान, या घटनेबद्दल नवरदेव सचिन भोसले याने मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असताना पुढे पोलिसांनी या टोळीच्या एजंटाला पंढरपूरात एक लग्नाळू तरूण असल्याचे कळविले. तेव्हा लगेचच दोन वाहनांतून टोळी पंढरपुरात आली. तोतया नवरदेव उभा करून पंढरपूरच्या अलिकडे पेनूर (ता. मोहोळ) येथे नक्षत्र मंगल कार्यालयात लग्न करण्याचे ठरले. त्यानुसार तेथे पोहोचलेल्या टोळीने नवरदेवाकडून पैसेही उकळले. त्यावेळी नवरदेवाचे नातेवाईक म्हणून साध्या पोशाखात आलेल्या पोलिसांनी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीला जेरबंद केले. या टोळीने तीन लाख २१ हजारांची रक्कम लुबाडल्याचे नितीन विष्णू भोसले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.