लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: मुलांसोबत प्रार्थनास्थळी गेलेली ३२ वर्षीय विवाहिता पोट दुखत असल्याने एकटीच घरी परतत असताना एका निर्जन ठिकाणी गाठून तीन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला व नंतर दगडाने ठेचून खून केला. चिकलठाणा विमानतळ परिसरात ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली.
याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली. रवी रमेश गायकवाड, राहुल संजय जाधव व प्रीतम महेद्र नरवडे, अशी आरोपींची नावे असून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. चरडे यांनी ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत विवाहिता ही प्रार्थनेसाठी मुलांसोबत घरातून गेली होती. मात्र, मासिक पाळी सुरू असल्याने मध्येच पोट दुखू लागले. त्यामुळे ती मुलांना प्रार्थना स्थळ परिसरात ठेऊन दुपारी घराकडे निघाली. विमानतळाच्या संरक्षण भिंतीच्या परिसरातील निर्जन भागात आरोपींनी तिला गाठले आणि हात बांधून अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला. सायंकाळी विवाहितेच्या मुलांना घरी घेऊन येणाऱ्या महिलेला एका झुडुपामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. अर्धविवस्त्र अवस्थेतील मृतदेह होता. घटनेची माहिती पोलिसांना दिली. घाटीत मृतदेह नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मृत विवाहितेवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.