जायकवाडीसाठी नाशिकमधून पाणी सोडण्याचा प्रश्न
जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्यावरून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रविवारी रात्री बंद पाडलेला विसर्ग सोमवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आला. विसर्ग बंद पाडण्याची आंदोलकांची कृती न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणारी ठरली.
दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या देत मुख्यमंत्री, जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पाण्याचा विसर्ग न थांबविल्यास ‘जिल्हा बंद’ची हाक देण्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे. या निर्णयास भाजपला जबाबदार ठरवत शिवसेनेने सर्वपक्षीयांची मोट बांधून त्यांच्याविरोधात वातावरण निर्मितीची खेळी केली आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात आली आहे.
मराठवाडय़ातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन गंगापूर धरण समुहातून १.३६ तर दारणा धरण समुहातून ३.२४ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने त्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर रविवारी रात्री गंगापूर, दारणा, मुकणे व कडवा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले.
ही माहिती समजल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणावर गोंधळ घालत पाटबंधारे विभागाला विसर्ग थांबविण्यास भाग पाडले. या कृतीद्वारे संबंधितांनी उच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रात्रीच्या आंदोलनामुळे पाणी सोडले जाणार नाही असा सर्वपक्षीयांचा समज होता.
सोमवारी सकाळी धरणाला पोलिसांचा वेढा पडला. दुपारी बारा वाजता गंगापूर धरणाचे दरवाजे उघडून १००० क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला. ही माहिती समजल्यानंतर सेनेचे आ. अनिल कदम, राष्ट्रवादीचे आ. जयंत जाधव, आ. योगेश घोलप आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून संताप व्यक्त केला. धरणाचा विसर्ग थांबविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी अमान्य केली. या निर्णयाचे खापर आंदोलकांनी मुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणजे भाजपच्या शिरावर फोडले. भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ग्रामीण भागात या निर्णयाचे पडसाद उमटले.
दरम्यान, नाशिकमध्ये आधीपासून दुष्काळी स्थिती असताना पाणी मराठवाडय़ासाठी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने जलसिंचन संस्थेच्या माध्यमातून नाशिककरांतर्फे सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी याचिका दाखल केली जाणार असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी गंगापूर धरणातून एक हजार, दारणा चार हजार, मुकणे एक हजार तर कडवा धरणातून तीन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

Story img Loader