अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार-रिद्धपूर रस्त्यावर एका २५ वर्षीय तरूण परिचारिकेला बळजबरीने गाडीत बसवून तिच्यावर आठ नराधमांनी बुधवारी रात्री बलात्कार केला. पोलीसांनी सहा आरोपींना अटक केली असून, दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणीची प्रकृती बिघडली असून, तिला उपचारांसाठी अमरावतीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार येथील एका खासगी रुग्णालयात काम करणारी ही परिचारिका बुधवारी काम संपवून रात्री साडेनऊच्या सुमारास रिद्धपूरकडे घरी निघाली होती. यावेळी रस्त्यावरील आठ नराधमांनी तिला बळजबरीने गाडीत बसवले. त्यानंतर तिला जालनापूरमधील एका निर्मनुष्य शेतात नेऊन तिच्यावर सर्वांनी आळीपाळीने बलात्कार केला. रात्री एकच्या सुमारास तरुणीने शिताफीने नराधमांच्या जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेतली आणि चांदुरबाजार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केल्यावर सहा जणांना पकडण्यात त्यांना यश आले. संदीप ठाकरे, प्रफुल्ल वानखेडे, महेश श्रीराव, शुभम वानखेडे, शिवा आणि संतोष अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण रिद्धपूरमधील राहणारे आहेत. त्यांच्याविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर संबंधित तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारांसाठी अमरावतीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा