शहरातील रोकडोबावाडी भागात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सात संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  मागील आठवडय़ात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेला टोळक्याने अडविले. प्रियकराला बेदम मारहाण करून तिघांनी महिलेवर बलात्कार केला. या वेळी चार साथीदारांनी संशयितांना मदत केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांना शोध सुरू केला. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मुख्य संशयित प्रदीप गरुड ऊर्फ केरू, जगन प्रदीप वानखेडे ऊर्फ जग्या यांच्यासह विजय साहेबराव उगले, तुषार भगवान भदरंग, कैलास गणेश बारहाते, अनिल दिलीप संधानशिव व दीपक मच्छिंद्र डोके या सात जणांना अटक करण्यात आली. या संशयितांना सोमवारी नाशिकरोड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.