कुख्यात गुंड अरुण गवळी याची मंगळवारी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटका करण्यात आली. मुलाच्या लग्नासाठी हजर राहता यावे, यासाठी अरुण गवळीने पॅरोलसाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने पॅरोलला मंजूरी दिल्यानंतर मंगळवारी ‘डॅडीं’ची सुटका झाली. अरुण गवळीचा मुलगा महेशचे गुरूवारी ७ मे रोजी मुंबईत लग्न आहे. तर, शनिवारी ९ मे रोजी महालक्ष्मी रेसकोर्स वरील टर्फ क्लबवर स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे. या महत्त्वाच्या क्षणी कुटुंबियांसोबत सहभागी होता यावे यासाठी अरुण गवळीने नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे पॅरोलचा अर्ज केला होता. मात्र, अरुण गवळी कारागृहाच्या बाहेर आला, तर साक्षीदाराच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा अहवाल गृहखात्याने दिल्यामुळे विभागीय आयुक्तांनी गवळीचा पॅरोल नामंजूर केला होता. यांनतर अरुण गवळीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत पॅरोलची मागणी केली होती. यावरील सुनावणीत नागपूरच्या खंडपीठाने अरुण गवळीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला मात्र, या काळात एक दिवसाआड मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावण्याची अट यावेळी घालण्यात आली.

Story img Loader