मुंबईतल्या दगडी चाळीतलं सर्वात कुख्यात नाव म्हणजे अरूण गवळी. अरूण गवळीला डॅडी असं म्हटलं जातं. एके काळी डॉन म्हणून अरूण गवळीची दहशत होती. सध्या अरूण गवळी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. अरूण गवळी हा आजारी आहे. आता कोर्टाकडे तो अक्षरशः दया याचना करतो आहे की त्याला घरी जायचं आहे. अरूण गवळीने बॉम्बे हायकोर्टाचा नागपूर बेंचकडे एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्याने आपल्याला फुफ्फुसं आणि पोटाचे विकार आहेत त्यामुळे शिक्षा माफ करावी अशी मागणी करतो आहे. अरूण गवळीने वयाची सत्तरी पार केली आहे. हायकोर्टाचे जज न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मनेजेस यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सरकारला नोटीस दिली आहे.
अरूण गवळी खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीने महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने २००६ मध्ये एक सर्क्युलर काढलं होतं त्या सर्क्युलरचा हवाला देऊन माफीची याचना केली आहे. २००६ च्या त्या सरकारी ऑर्डरमध्ये हे लिहिलं होतं की ज्या कैद्यांचं वय ६५ वर्षे आहे आणि १४ वर्षांची शिक्षा भोगून झाली आहे त्यांना तुरुंगातून मुक्त करता येईल. या आदेशाचा हवाला देऊन अरूण गवळीने आपल्याला आता तुरुंगातून सोडण्यात यावं असं म्हटलं आहे. हायकोर्टाने आपली शिक्षा माफ करावी असं म्हटलं आहे.
अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी २००८ च्या मे महिन्यापासून तुरुंगात आहे. यानंतर आता अरूण गवळीने कोर्टात आपल्या मुक्ततेसाठी याचिका दाखल केली आहे. मी आता ७० वर्षे पार केली आहेत. माझं वय झालं आहे आणि मला पोटाचा तसंच फुफ्फुसांचा विकार आहे. तसंच माझ्या शिक्षेची १४ वर्षेही पूर्ण झाली आहेत त्यामुळे मला सोडण्यात यावं आणि उर्वरित शिक्षा माफ केली जावी असं अरूण गवळीने म्हटलं आहे.
अरूण गवळी हा कुख्यात डॉन आहे. २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकार जामसांडेकर विजय गिरी नावाच्या एका गुंडाने त्यांच्या घरी जाऊन गोळ्या घालत हत्या केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब समोर आली की कमलाकर जामसांडेकर यांना ठार करण्याची ही सुपारी अरूण गवळीने दिली होती. याच प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पोलिसांनी २००८ मध्ये अरूण गवळीला याच हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा अरूण गवळी महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होता.
अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीने मागची ३० वर्षे या कुख्यात गुन्हेगारी विश्वावर राज्य केलं. मुंबईमध्ये जेव्हा साखळी स्फोट झाले त्याआधीच दाऊद इब्राहीम आणि त्याची गँग भारतातून निघून गेली होती. त्यावेळी डॉन म्हणून अरूण गवळी उदयास आला. १९९४ मध्ये अरूण गवळी आणि अमर नाईक या दोन कुख्यात गुंडांमध्ये गँगवॉर झालं होतं. अरूण गवळीचा शार्प शूटर रवींद्र सावंतने अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईकवर जीवघेणा हल्ला गकेला होता. त्यानंतर १० ऑगस्ट १९९६ ला पोलिसांनी अमर नाईकला ठार केलं आणि त्याचा भाऊ अश्विन नाईकला अटक केली. त्यानंतर मुंबईत अरूण गवळीचाच दबदबा होता.