गॅंगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांनी चीनमधून अटक केली आहे. प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यात आले असून गेल्या काही वर्षांपासून तो फरार होता. पुजारीवर खून आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये प्रसाद पुजारीचा हात असल्याचा आरोप आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रसाद पुजारीला मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर चीन सरकारने प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
प्रसाद पुजारी २० वर्षांपासून होता फरार
गॅंगस्टर प्रसाद पुजारी याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून २०२० मध्ये त्याच्यावर अखेरचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर प्रसाद पुजारीच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रसाद पुजारी हा २००८ पासून चीनमधील एका शहरात राहत होता. चीनमधील राहण्याची त्याची मुदत मार्च २०१२ मध्ये संपली होती. मात्र, त्यानंतरही तो चीनमध्ये वास्तव्यास होता.
चिनी मुलीशी केले लग्न
गॅंगस्टर प्रसाद पुजारी याच्यावर भारतात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे तो या गुन्ह्यांतून वाचण्यासाठी चीनमध्ये पळून गेला होता. तेथेच त्याने एका मुलीशी लग्न केले. प्रसाद पुजारी हा प्रवासी व्हिसावर चीनमध्ये गेला होता. मात्र, आता प्रसाद पुजारीला चीनमधून अटक करण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे.
शिवसेना नेत्यावरील गोळीबारात पुजारीचा हात
मुंबईतील विक्रोळी परिसरात राहणारे शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर १९ डिसेंबर २०१९ मध्ये गोळबार झाल्याची घटना घडली होती. या गोळीबारात सुदैवाने चंद्रकांत जाधव यांचे प्राण वाचले होते. या गोळीबाराच्या प्रकरणात प्रसाद पुजारी याचे नाव समोर आले होते. दरम्यान, अखेर २० वर्षांनी प्रसाद पुजारी याला मुंबईत आणण्यात आले आहे.