उत्सवप्रिय कोकणात प्रत्येक उत्सव हा मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो तो कोकणवासीयांच्या जीवनशैलीचा आणि परंपरेचा भाग झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोकणातील सण उत्सवांचे स्वरूप बदलत असल्याचे दिसून येत आहे. सण उत्सवांचे धार्मिक महत्त्व कमी होऊन त्यांना उत्सवी आणि मौजमजेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पारंपरिक पद्धतींना फाटा देत भपकेबाजपणा वाढत चालला आहे. रायगड जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांत साखरचौथींचा गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत १९३ सार्वजनिक आणि ३२५ घरगुती साखरचौथीच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
कोकणात घराघरात गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव फारसा साजरा केला जात नव्हते. पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी उत्तर कोकणात अलीकडच्या काळात साखरचौथीच्या गणेशोत्सवांचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव संपल्यावर वद्य चतुर्थीला या गणेशोत्सवाचे आयोजन केले जाऊ लागले आहे. कुठे दीड दिवस, कुठे तीन दिवस, तर कुठे पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला आहे.
रस्त्यालगत मोठे सभामंडप, आकर्षक रोषणाई, भव्यदिव्य विसर्जन मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम ही या गणेशोत्सवाची ओळख बनली आहे. कुठलेही धार्मिक अधिष्ठान नसताना केवळ सामाजिक अधिष्ठानाच्या जोरावर या गणेशोत्सवाला साजरा करण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत साखरचौथी गणेशोत्सव मंडळांची संख्या वर्षांगणिक वाढत आहे.
प्रामुख्याने अलिबाग, पेण, पनवेल, उरण, रोहा या परिसरात साखरचौथीचा गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जाऊ लागला आहे. यात पेण तालुक्यातील गणपतींचे प्रमाण अधिक आहे. या गणेशोत्सवाला गणपती बनवणाऱ्या मूर्तिकारांचा उत्सव असेही संबोधले जाते. पेणमध्ये वर्षभर गणपती बनवण्याचे काम सुरू असते. वर्षभरात या परिसरातून जवळपास २० लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवासाठी त्या देशविदेशात पाठवल्या जातात. त्यामुळे गणपती व्यावसायिकांना आपल्या घरी हा गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे वद्य चतुर्थीला हे मूर्तिकार आपल्या घरी गणपती बसवतात. या गणपतीच्या विसर्जनानंतर पुढील वर्षांसाठी गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू केले जाते. उत्तर कोकणात या गणपतीला साखरचौथीचा, तर तळ कोकणातील काही भागांत याला गौरा गणपती असे संबोधले जाते.
रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत मंगळवारी १९३ सार्वजनिक आणि ३२५ घरगुती साखरचौथीच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तर ढोल-ताशांच्या गजरात आज या गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे.