मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेले १० दिवस गणेशोत्सव मोठ्या ज्ल्लोषात साजरा करण्यात आला. १० दिवस गणरायाची मनोभावे सेवा करून गणेशभक्तांनी गुरुवारी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (२८ सप्टेंबर) लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. मुंबईतल्या वेगवेगळ्या चौपाट्यांवर घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. पुण्यातल्या मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तर मुंबईत ढोल-ताशांच्या निनादात आणि डीजेच्या तालावर नाचून मुंबईकरांनी गणपती बाप्पाला निरोप दिला.
दरम्यान, गुरुवारी दुपारी नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तुळशीबाग परिसरातून ही मिरवणूक सुरू झाली आणि संध्याकाळी बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. तर अकोल्यातही मोठ्या विसर्जन मिरवणुका पाहायला मिळाल्या. अकोल्यातील सात आखाड्यांचे गणपती पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढून विसर्जित करण्यात आले.
कोल्हापुरातही तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपती बाप्पाचे गुरुवारी संध्याकाळी विसर्जन करण्यात आले. खासबाग मैदानापासून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. तर, मुंबईतील पहिला गणपती अर्थातच गिरगावातील केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू होती. आता काही वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे.
दरम्यान, अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेने जोरदार तयारी केली होती. १० हजार कर्मचारी, ७१ पोलीस नियंत्रण कक्ष, गणेश विसर्जनासाठी १९८ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.