महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये दिवाळीच्या काळात घनकचरा जाळल्याने फटाक्यांच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण झाल्याची धक्कादायक माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात मनाई केली असतानाही कचरा जाळून टाकण्याचे प्रमाण राज्यभरात सातत्याने वाढत चालले असून याचे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर अतिशय घातक परिणाम होऊ लागले आहेत. सर्वच शहरांमधील महापालिका आणि नगरपालिकांची कचरा व्यवस्थापन यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिवाळीच्या निमित्ताने समोर आले आहे.
कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे. फोम कप्स, अंडय़ाचे ट्रे जाळल्याने निघणारा स्टायरिन वायू त्वचा आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. डॉक्झिनमुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते.
सर्वोच्च न्यायालयाने २००० साली भारतातील सर्व शहरांमध्ये र्सवकष कचरा व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश जारी केले होते. कचरा गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि खत बनविणे अशा तीन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, परंतु कचरा जाळण्याचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढलेले असून अवैज्ञानिक पद्धतीने कचरा नष्ट केला जात असल्याने वायू प्रदूषण दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालले आहे. महापालिका किंवा नगरपालिकांचे सफाई कर्मचारीच कचरा जाळण्यात आघाडीवर आहेत. याच्या दुष्परिणामांची त्यांना कोणतीही जाणीव करून दिली जात नाही. सर्वच शहरांमध्ये हा प्रकार बिनधास्त सुरू आहे.
सणावाराच्या दिवसांत स्वत:चे घर आणि वस्ती स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा थेट रस्त्यावर जाळला जातो. कचरा वाहून नेण्याचे काम अधिक परिश्रमाचे असल्याने जाळून त्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीची आहे. घन कचऱ्यात पालापाचोळा, प्लास्टिक, जुने कपडे यांचा सर्वाधिक प्रमाणात समावेश राहतो.
या वस्तू जाळल्याने अतिशय विषारी वायू निसर्गात पसरतात. प्लास्टिक जाळल्यानंतर क्लोरिन, ब्रोमाइनची निर्मिती होते. त्यापासून पृथ्वीच्या आवरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे.
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. स्थानिक नागरिक आणि सफाई कर्मचारीच कचरा जाळण्यात आघाडीवर आहेत. यापासून आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव लोकांना करून देण्याची वेळ आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर महाराष्ट्राला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा