लेझीम, झांज, टिपरी खेळांचे एकापेक्षा एक सरस डाव, ढोलताशा व हलग्यांचा दणदणाट आणि सोबत सनईच्या मधूर स्वरांचा निनाद अशा जल्लोषमय वातावरणात निघालेल्या भव्य दिव्य मिरवणुकांनी लाडक्या गणरायाचे सोलापुरात स्वागत झाले. सायंकाळी वरूणराजानेही गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकांवर पाऊस पाडून उत्साह अधिकच द्विगुणीत केला.
शहरात सुमारे १४५० तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे अडीच सार्वजनिक मंडळांनी उत्साही वातावरणात ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली. दिवसभर प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका चालू होत्या. १३० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मानाच्या आजोबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक भव्य होती. एकाचवेळी शंभरपेक्षा अधिक तरूण मुला-मुलींनी ढोल-ताशांचा आविष्कार सादर करून तमाम गणेश भक्तांच्या नेत्रांचे पारणे फेडले. दुपारी माणिक चौकातील मंदिरात आजोबा गणपतीची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना झाली. तर लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या अधिपत्याखालील पत्रा तालीम मंडळाच्या पणजोबा गणपतीची दुपारी यथासांग विधी पूर्ण करून प्रतिष्ठापना झाली. पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाचा ताता गणपती, बाळीवेशीतील कसबा गणपती, पाणीवेस तालीम मंडळाच्या गणरायाची वाजतगाजत मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात आली.
जुळे सोलापुरातील इंडियन मॉडर्न स्कूलच्या श्री प्रतिष्ठापनेची मिरवणूक अतिशय देखणी होती. सात रस्ता येथून निघालेल्या या मिरवणुकीचा प्रारंभ सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. लेझीम, झांज पथकांसह ढोलताशांचे पथक लक्षवेधी होते. अग्रभागी ऊंट व घोडेस्वार होते. कसबा गणपतीच्या मिरवणुकीचा प्रारंभ चार हुतात्मा पुतळ्यांपासून महापौर प्रा.सुशीला आबुटे यांच्या हस्ते झाला. या मिरवणुकीत लेझीम पथकाने बहारदार खेळाचा आविष्कार घडविला. शतक महोत्सव साजरा करणाऱ्या पाणीवेस तालीम मंडळाच्या मिरणुकीत लेझीम खेळाबरोबर वारकरी सांप्रदायातील लहान मुलांची िदडी होती. महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. सायंकाळी श्री प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांना अधिक रंगत आली होती. नवीपेठ, माणिक चौक, मेकॉनिक चौक, पार्क चौक, बाळीवेस, पूर्व भाग आदी ठिकाणी मिरवणुकांनी रस्ते अक्षरश फुलून गेले होते. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी यंदा कन्ना चौक, राजेंद्र चौक, मधला मारूती, कोंतमा चौक आदी भागातील वर्षांनुवष्रे चालणारी गणेश मूर्ती विक्रीवर बंदी घालून होम मदानासह अन्य चार मदानावर गणेशमूर्ती विक्रीची दालने सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक
सुरळीत होती.
सोलापुरात लेझीम, झांज, हलग्यांचा दणदणाट
सायंकाळी वरूणराजानेही गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकांवर पाऊस पाडून उत्साह अधिकच द्विगुणीत केला.
Written by रत्नाकर पवार
First published on: 18-09-2015 at 00:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garnd welcome to ganpati in solapur