मिरजेच्या विविध भागात गॅस्ट्रोचे थमान शनिवारी कायम असून सहारा कॉलनीतील अस्लम सलीम शेख याच्या मृत्यूने बळींची संख्या तीन वर पोहचली आहे. महापालिका उपायुक्त प्रशांत रसाळे यांनी शहरात गॅस्ट्रो, कॉलरा आणि अतिसाराच्या रुग्णांची संख्या १०२ वरून ४२ झाल्याचा दावा केला असला तरी आजही दवाखान्यात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
असलम नदाफ याच्या मृत्यूनंतर शुक्रवारी सायंकाळी ब्राम्हणपुरीत राहणार्या रमेश हणमंत पाटील या वृध्द इसमाचा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला. यानंतर शनिवारी सकाळी सहारा कॉलनीत राहणाऱ्या अस्लम सलीम शेख या ६० वर्षांच्या इसमाचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे शहरात गॅस्ट्रोमुळे मृत्यू पावणार्याची संख्या तीन झाली आहे.
मिरजेच्या ब्राम्हणपुरीसह गोदड मळा, टाकळी रस्ता, वेताळबानगर, म्हैसाळवेस, सहारा कॉलनी, विजापूरवेस या परिसरात गॅस्ट्रोचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय, भारती हॉस्पिटल, पाठक हॉस्पिटल, म्हेत्रे हॉस्पिटल, चव्हाण आदी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहेत. तसेच महापालिका रुग्णालयातही रुग्णांना सलाईन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही रुग्णांना त्यांच्या घरातच सलाईन लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेचे उपायुक्त प्रशांत रसाळे यांच्याशी संपर्क साधला असता साथ जास्त पसरणार नाही याची आरोग्य विभागाने दक्षता घेतली असल्याचे सांगितले. शहरातील सर्व रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता आज ४२ रुग्ण आढळले असून काल १०२ रुग्ण उपचारासाठी होते. बऱ्याच रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. लोकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले असून पाणी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभाग समन्वय साधून साथ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंचशीलनगर येथे ड्रेनेज पाईप फुटून त्याचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये मिसळले असल्यामुळे साथ पसरल्याची शक्यता असून आज पंचशीलनगर येथील ड्रेनेज गळती पूर्णपणे थांबविण्यात आली असल्याचे श्री रसाळे यांनी सांगितले.
कराडमध्ये ‘डेंग्यू’ बाबत कार्यशाळा संपन्न
वार्ताहर, कराड
सध्या सर्वत्र ‘डेंग्यू’ ची साथ सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डासांची उत्पत्ती टाळण्याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेसंदर्भात प्रबोधनपर कार्यशाळा पार पडली. कराड नगरपालिका व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातर्फे नगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही कार्यशाळा पालिकेच्या सभागृहात आरोग्य विभागाचे सभापती महंमद चाँद बागवान यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सनम, आरोग्य विस्तार अधिकारी कोळी, मलेरिया पर्यवेक्षक विजय कुंभार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया या आजारांविषयी सविस्तर मार्गदर्शन करून सदरचे आजार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे आवाहन योवळी करण्यात आले. प्रास्ताविक पालिकेचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी केले.
मिरजेत गॅस्ट्रोचे थैमान; तिघांचा मृत्यू, ४२ रुग्ण
मिरजेच्या विविध भागात गॅस्ट्रोचे थमान शनिवारी कायम असून सहारा कॉलनीतील अस्लम सलीम शेख याच्या मृत्यूने बळींची संख्या तीन वर पोहचली आहे.
First published on: 23-11-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gastro in miraj