श्रीवर्धन तालुक्यातील वडवली परिसरात गॅस्ट्रोची साथ परसरली आहे. यात आतापर्यंत एका बालकाचा मृत्यू झाला आहे, तर २९ मुलांना बोर्ली पंचायतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यापैकी पाच मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. वडवली परिसरात दूषित पाण्यामुळे ही गॅस्ट्रोची साथ पसरली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या परिसरातील १ ते २ वर्षांच्या मुलांना अचानक उलटय़ा व जुलाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र दाखल केलेल्या २९ बालकांपैकी पाच बालकांची प्रकृती खालावल्याने त्यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या साथीमुळे मंगेश बराडी या १० महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे.
या साथीमुळे जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, वडवली येथील आगरी समाज मंदिरात एका विषेश आरोग्य कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. परिसरातील लहान मुलांना जर उलटय़ा आणि जुलाब होत असतील, तर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे, पाणी उकळून प्यावे व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांच्या पथकाकडून केले जात आहे. त्याचबरोबर कुठलाही आजार अंगावर काढू नये असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर देवकर यांनी केले आहे.
दरम्यान मुलांना साथीचा प्रादुर्भाव कशामुळे झाला, याचा तपास करण्यासाठी शौचाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. ठाकरे यांनी देखील या भागाची पाहाणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा