कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन दिवसांपूर्वी म्हैसूरू येथील प्रा. के एस भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार जणांना अटक केली होती. हे चौघेही एका हिंदूत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी अमोल काळे उर्फ भाईसाहेब (३९) हा चिंचवड येथे राहणारा आहे. स्थानिक पोलिसांना या अटकेबद्दल काहीही माहिती नाही.

या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. दि. ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती.

हे चारही संशयित हे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. या सर्वांचे के टी नवीन कुमार (वय ३७) या हिंदू युवा सेनेच्या कार्यकर्त्याशी संबंध असल्याचा संशय एसआयटीला आहे. या सर्वांच्या पूर्वी अनेकवेळा बैठका झालेल्या आहेत. नवीन कुमारला गौरी लंकेश हत्येप्रकरणी मार्च २०१८ मध्ये अटक करण्यात आली आहे.

हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय ३९, महाराष्ट्र), सनातन संस्थेचा कार्यकर्ता अमित देगवेकर उर्फ प्रदीप (वय ३९, गावा) कर्नाटकातील विजयपूर येथील मनोहर इडवे (वय २८), हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा कार्यकर्ता सुजीत कुमार उर्फ प्रवीण (वय ३७, मंगळुरू) या चौघांना प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Story img Loader