Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकावर कार आदळून हा अपघात घडला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसह विविध उद्योगपतींनी दु:ख व्यक्त केलं आहे. अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनीदेखील ट्वीट करत सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला असून अतीव दु:ख झालं आहे. मी ओळखत असलेल्या लोकांपैकी सायरस मिस्त्री हे सर्वाधिक मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम व्यावसायिक व्यक्तीमत्व होते. त्यांचा असा अपघाती मृत्यू होणं दुःखद आहे. त्यांनी खूप लवकर जगाचा निरोप घेतला. माझ्या सद्भभावना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती.”
हेही वाचा- सायरस मिस्त्रीच्या कारला अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम
सायरस मिस्त्री चांगले मित्र होते- हर्ष गोयंका
उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याची धक्कादायक बातमी ऐकून खूप दु:ख झालं. ते एक चांगले मित्र होता आणि सभ्य व्यक्ती होते. जागतिक बांधकाम क्षेत्रातील बडी कंपनी शापूरजी पालोनजी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी टाटा समूहाचंही नेतृत्व केलं आहे.