नृत्यांगना गौतमी पाटीलविरोधात सोलापूरच्या बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजकानेही ही तक्रार दाखल केली आहे. गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केली अशी तक्रार कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे. राजेंद्र गायकावांडाच्या या आरोपांवर गौतमी पहिल्यांदाच बोलली आहे. ती म्हणाली, या पोलीस तक्रारीबद्दल मला दुपारीच समजलं. परंतु अद्याप त्याबद्दलची पूर्ण माहिती मिळालेली नाही.
नृत्याच्या कार्यक्रमांद्वारे अल्पावधीतच तरुणांची आवडती नृत्यांगणा बनलेली गौतमी पाटील हिचा लावणी महोत्सव बार्शी शहरात कोणतीही परवानगी न घेता आयोजित केल्याप्रकरणी संयोजकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे गौतमी पाटील व तिच्या सचिवाने आपली फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप संयोजकाने केला असून त्याबद्दलची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली आहे.
या आरोपांबाबत गौतमी पाटील हिच्याशी टीव्ही ९ मराठीने बातचित केली, तेव्हा गौतमी म्हणाली, मी कार्यक्रमाला वेळेत गेले होते. आपल्याला परवानगी मिळालेली असते त्याच वेळेत कार्यक्रम केला जातो. तुम्ही आयोजकांना विचारू शकता, की त्यांचं गौतमीसोबत बोलणं झालंय का? गौतमीसोबत कार्यक्रम ठरवलाय का? कारण, मी कधीच आयोजकांशी बोलत नाही, मी येते, कार्यक्रम करते आणि निघून जाते.
मूळचे बार्शीचे असलेले राजेंद्र गायकवाड यांनी गौतमीविरोधात तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांनी गौतमी पाटील आणि तिच्या सचिवाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारा तक्रारी अर्ज बार्शी शहर पोलीस ठाण्यात केला आहे. तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून यात गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.