सांगली : मी इष्काची हो इंगळी, पाव्हणा झालाय येडापिसा या लावणीवर नृत्य करीत असताना दिलकी कातील म्हणून तरूणाईला झिंग आणणारी गौतमी पाटील तोल गेल्याने व्यासपीठावरच कोसळण्याची घटना रविवारी रात्री पलूस येथील दहीहंडीवेळी घडली.नृत्य करीत असताना व्यासपीठावरच गौतमी कोसळल्याने हजारो युवकांच्या काळजाचा ठोका चुकला असला तरी फारशी गंभीर दुखापत झालेली नाही हे पाहून उपस्थित तरूणांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पलूस येथे पृथ्वी-संग्राम युथ फाउंडेशनच्यावतीने रविवारी रात्री भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या दहीहंडी उत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्या नृत्याने रंगत भरली. व्यासपीठावर गौतमी एका लावणीवर नृत्य करीत प्रेक्षकांना नाच करण्यासाठी प्रोत्साहन देत समोर आली असतानाच पाय लचकल्याने खाली कोसळली. काही क्षण तिला उठताच येईना.
यावेळी तिच्या अंगरक्षकांनी तिला उठवून बाजूला केले. मात्र, अल्पशी दुखापत झाल्याने पुन्हा तिने नृत्य करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. या मानाच्या दहीहंडीसाठी विजेत्यांना १ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचे तर सलामी देणार्या प्रत्येक संघास २५ हजाराचे बक्षीस पृथ्वी-संग्राम युथ फाउंडेशन देण्यात आले होते. सांगली कोल्हापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जवळपास ७ संघ या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते.