नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नाशिकमधील कार्यक्रमात मंगळवारी (१६ मे) मद्यपी युवकांनी हुल्लडबाजी करीत गोंधळ घातला. तसेच दोन छायाचित्रकारांना मारहाण केली. यानंतर हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यानंतर या घटनेची जोरदार चर्चा होती. आता स्वतः गौतमी पाटीलला या प्रकाराबाबत पत्रकारांनी विचारणा केली. त्यानंतर तिने तिची भूमिका स्पष्ट केली.
“छायाचित्रकाराला मारहाणीबाबत मला माहिती नव्हतं”
गौतमी पाटीलला तिच्या कार्यक्रमात झालेल्या हुल्लडबाजी आणि छायाचित्रकाराला मारहाण या प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “खरंतर त्या गोष्टीविषयी मला काहीही माहिती नव्हतं. मी कार्यक्रमाच्या येथून निघाले. अर्ध्यापर्यंत पोहचले. तेव्हा मला ही गोष्ट समजली. जे माझा कार्यक्रम पाहायला येतात त्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कृपया वाद करू नका. आपण सगळे एकच लोक आहोत. मीही तुमच्यातीलच आहे.”
“कार्यक्रमाचा आनंद घ्या, फक्त वाद घालून कुणालाही मारहाण करू नका”
“चाहते माझा कार्यक्रम पाहायला इतक्या लांब पाहायला येतात. त्यामुळे त्यांनी माझा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. मात्र, वाद घालू नका. छान कार्यक्रमाचा आनंद घेऊन जा. मला काहीही अडचण नाही. फक्त वाद घालून कुणालाही मारहाण करू नका. या मारहाणीचा मी निषेध करते. ते साहजिक आहे, कारण एखाद्याला मारणं चुकीचंच आहे,” असंही गौतमी पाटलीने नमूद केलं.
नेमकं काय घडलं होतं?
नेमकं काय घडलं होतं? यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली, “मी कार्यक्रमाला वेळेत गेले. माझ्याबरोबरच्या मुली कार्यक्रमासाठी तयार होत्या. मात्र, मला आयोजक कार्यक्रम सुरू करा तेव्हाच मी कार्यक्रम सुरू करते. ते आठ वाजता म्हटले तर, आठ, नऊ वाजता म्हटले तर नऊला सुरू करेन. मला कार्यक्रमाची परवानगी १० वाजेपर्यंत असते. पोलीस माझ्याकडून त्या एका पत्रावर स्वाक्षरी करून घेतात. पोलीस खूप सहकार्य करतात. त्यामुळे आपण पोलिसांनाही साथ देणं गरजेचं आहे.”
“मला कार्यक्रमाची परवानगी होती. पोलीस मला १० वाजता कार्यक्रम बंद करा म्हटले, तर मी कार्यक्रम बंद केला. पोलिसांनी बंद करायला सांगितल्यावर मी त्यानंतर कार्यक्रम करूच शकत नाही. तो कार्यक्रम तिकिटावर होता. म्हणून आयोजक म्हटले थांबा थांबा. त्यामुळे आम्ही थांबलो. कार्यक्रम सुरू करणं आमच्यावर काहीही नसतं. आयोजक म्हटले कार्यक्रम सुरू करा, तर मी आत्ताही कार्यक्रम सुरू करेन. मात्र, मी पोलिसांच्या परवानगीपुढे जाऊ शकत नाही,” असं गौतमीने नमूद केलं.