आपल्या नृत्याप्रमाणेच त्यातून उद्भवणाऱ्या वादांसाठी गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेली गौतमी पाटील हिला आता छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध झालेल्या घनश्याम दरोडेनं जाहीर इशारा दिला आहे. गौतमी पाटीलच्या नृत्यावर अश्लीलतेचा आक्षेप घेणाऱ्यांकडून ‘महाराष्ट्राचा बिहार होत आहे’, अशी भूमिका मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर घनश्याम दरोडेनंही तशीच भूमिका मांडली होती. आता तर घनश्यामनं गौतमी पाटीलला थेट सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, अश्लील हावभाव करून मोठं होऊ नका, असा सल्लाही घनश्यामनं दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घनश्याम दरोडे लहानपणापासूनच त्याच्या बोलण्याच्या लकबीमुळे प्रचंड चर्चेत आला होता. राजकीय वर्तुळातूनही त्याच्या या बोलण्याच्या स्टाईलचं कौतुक करण्यात आलं होतं. आता घनश्याम दरोडेनं मुसंडीच्या निमित्तानं अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं असताना त्यानं ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील वादावर आपल्या हटके स्टाईलमध्ये भूमिका मांडली आहे.

“गौतमी पाटील जेव्हा डाऊन होतील, तेव्हा…”

“गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करतायत. आज गौतमी पाटील स्टार आहेत. पण हे वातावरण किती काळ चालेल? गौतमीताई जेव्हा डाऊन होतील, तेव्हा हे वातावरण बिघडवून डाऊन होतील. गौतमीताईंना मी एक सांगेन, तुम्ही हे चुकीचं करताय. गौतमीताईंनी खूप स्ट्रगल केलाय. मला मान्य आहे. पण गौतमीताईंचा एक तरी कार्यक्रम सुखरुप झालाय का? कुठे दंगल झाली, कुठे दंगा झाला. गौतमीताई स्टेजवर गेल्या आणि सुखरुपपणे बाहेर आल्यात असं कधी झालंय का?” असा प्रश्न घनश्याम दरोडेनं उपस्थित केलाय.

“गौतमी पाटील यांनी त्यांच्या अदा बदलाव्यात”

“पूर्वीच्या कलाकारांचा गौतमी ताईंनी इतिहास पाहावा. सुरेखाताई पुणेकर, मंगलाताई बनसोडे यांची उदाहरणं आहेत. तमाशा ही शेतकऱ्यांसाठी करमणूक आहे. पण गौतमीताईंनी त्याचा अभ्यास केला नाही. त्यांनी कला सादर करावी, नृत्य करावं. पण गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करून मोठं होऊ नये. गौतमीताईंनी त्यांच्या अदा बदलाव्यात”, असा जाहीर सल्लाच घनश्याम दरोडेनं दिलाय.

गौतमी पाटीलनं मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्यावर दिलं प्रत्युत्तर; म्हणाली, “मी जर पाटील आहे तर…!”

“…तर त्याला महाराष्ट्र जबाबदार राहणार नाही”

“सोलापुरात गौतमीताई पाटलांचा कार्यक्रम चालू असताना खाली तरुण मार खात होते. याला जबाबदार कोण? गौतमीताई, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय. तुम्ही विचार करा. आज ही दंगल स्टेजच्या खाली होतेय, उद्या ही दंगल स्टेजवर येईल. ही दंगल स्टेजवर आल्यावर तुम्हालाही आवरता येणार नाही. यामध्ये तुम्हीही मार खाऊ शकता. तेव्हा त्याला महाराष्ट्र जबाबदार नसणार, तुमचे कारनामे जबाबदार असणार. तुम्ही कार्यक्रमातली गर्दी आयोजकांना आवरायला सांगा ना”, अशा शब्दांत घनश्यामनं गौतमी पाटीलला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

“तुमच्या या चाळ्यांमुळे तरुण बिघडायला लागला आहे. त्या दिवशी गौतमी ताईंनी स्टेजवर तरुणाला किस केलं, हे कितपत योग्य आहे? महाराष्ट्राचा बिहार होतोय. गौतमीताई काय लहान नाहीत किंवा आम्ही मोठे नाहीत की ताईंना आम्ही काही सांगावं. पण अश्लील हावभाव करून गौतमीताईंनी मोठं होऊ नये अशी माझी विनंती आहे”, असंही घनश्याम दरोडे म्हणाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil dance controversy ghanshyam darade targets pmw