गेल्या वर्षभरापासून गौतमी पाटील चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा तिच्यासंदर्भातल्या वादांची होते. मग ते तिच्या अश्लील हावभावांची असो, तिच्या आडनावाची असो किंवा मग तिच्या विधानांची असो. त्यामुळे एकीकडे सातत्याने गौतमी पाटीलभोवती वादाचं वलय असताना दुसरीकडे तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि तिची प्रसिद्धीही वाढत चालली आहे. मात्र, असं असलं तरी तिला होणारा विरोधही कमी नाही. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांत गोंधळ घालण्याच्या घटना वाढत असून अशा लोकांवर गौतमी पाटील चांगलीच संतापली आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी नगरमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. काही पोलिसांनी या तरुणांना कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढलं. मात्र, याआधीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या घटना घडल्या आहेत. काहींनी तर जाहीरपणे गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद पाडण्याचा इशाराच दिला आहे. तिच्या कार्यक्रमांना विरोधही केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलनं गोंधळ घालणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
काय म्हणाली गौतमी पाटील?
नगरमधील कार्यक्रमात हुल्लडबाजी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना गौतमी पाटीलनं गोंधळ घालणाऱ्यांनी कार्यक्रमाला येऊ नये, असं म्हटलं आहे. “ज्यांना दगडफेक करायची असेल, त्यांनी माझा कार्यक्रम पाहायला येऊ नका. ज्यांना फक्त आनंद घेण्यासाठी कार्यक्रम पाहायचा असेल, त्यांनी आवर्जून या. ज्यांना गोंधळ करायचा असेल, त्यांनी येऊ नका”, असं गौतमी म्हणाली आहे.
दरम्यान, यावेळी इतर राज्यांमधून व विदेशातूनही आपल्याला कार्यक्रमांची आमंत्रणं येत असल्याचं गौतमी म्हणाली. “इतर राज्यांमध्ये, देशांमध्ये शो करण्याचे आमंत्रण आले आहेत. पण मी अजून निर्णय घेतलेला नाही. मला वाटलं तर मी नक्की बाहेर कार्यक्रम करेन”, असं ती म्हणाली.
गौतमी पाटील व वाद!
गेल्या वर्षभरापासून गौतमी पाटील आणि वाद हे समीकरणच झालं आहे. गौतमी पाटीलच्या नृत्यशैलीवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेण्यात आला. विशेषत: लावणी विश्वातून गौतमी पाटीलच्या नृत्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला. अश्लील हावभाव म्हणजे लावणी नव्हे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर गौतमी पाटीलच्या पाटील आडनावावरून वाद निर्माण झाला. तिनं स्वत:च मारहाणीचे आरोप केलेल्या तिच्या वडिलांनीच तिच्या बाजूने उतरत तिचं समर्थन केलं.