गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नृत्य करणारी गौतमी अनेकदा नृत्य करताना अश्लील हावभाव करते, अशी टीका तिच्यावर नेहमी होत असते. नेतेमंडळींपासून सामान्य लोकांपर्यंत अनेकजण एकीकडे तिच्यावर टीका करतात तर दुसरीकडे तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना हजारो लोक जमतात. बऱ्याचदा तमाशा कलावंतांनी देखील गौतमीवर टीका केली आहे.
वसंत नांदवळकर तमाशा मंडळातील तमाशा कलाकारांनी गौतमी पाटीलसारख्या लोकांमुळे तमाशा कसा बदलतोय यावर भाष्य केलं. एबीपी माझाशी बोलताना या मंडळातील महिला नृत्यांगनांनी गौतमीवर टीका केली.
वसंत नांदवळकर तमाशा मंडळातील एक नृत्यांगना म्हणाली की, ती (गौतमी पाटील) तिची कला सादर करते, त्यावर काही आक्षेप नाही. परंतु तिचे चाळे (अश्लील हावभाव) योग्य वाटत नाहीत. हल्ली तिचे चाळे पाहून लोक आम्हालाही तसंच करा असं म्हणू लागले आहेत. त्यामुळे स्टेजवर नाचायला गेल्यानंतर पंचाईत होते. बऱ्याचदा लोक आम्हाला मोबाईलवर तिचे व्हिडीओ दाखवतात आणि म्हणतात तुम्हीही तसंच करा.
नृत्यांगना म्हणाली की, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांना तमाशा आवडायचा, लावण्या आवडायच्या, गण-गवळण आवडायची. परंतु आताच्या पिढीतील तरुणांना हिंदी गाण्यांवरील नाच आवडतो.
हे ही वाचा >> सांगलीत काँग्रेसची अवस्था ‘रणांगणावर बाजी आणि तहात माजी’
“काही लोकांनी कलेची च्येष्टा केलीय”
या तमाशा मंडळातील दुसरी नृत्यांगना म्हणाली की, आम्ही लावणी सादर करतो. परंतु हल्ली लोकांना फक्त गाणी हवी असतात. गौतमीच्या कलेत आणि आमच्या कलेत खूप फरक आहे. लावणीत नऊवारी साडी नेसून अंग झालेली नृत्यांगना नृत्य करते. परंतु हल्ली अंगप्रदर्शन केलं जातं, कलेची च्येष्टा केली आहे काही लोकांनी.