|| हर्षद कशाळकर
उत्पादकता वाढविण्याचे आव्हान
अलिबाग: अलिबागच्या रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे आणि या काद्यांच्या विपणनाची व्यवस्था यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
अलिबाग तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव आदी आठ गावांत या कांद्याची लागवड केली जाते. भात कापणीनंतर जवळपास २०० ते २५० हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी संवर्धित केलेल्या शुद्ध बियाण्यांचा यासाठी वापर केला जातो. साधारणपणे दोन ते अडीच महिन्यात कांद्याचे पीक तयार होते. स्थानिक महिला विशिष्ट पद्धतीने या कांद्याच्या माळा विणतात. एका माळेला १५० ते २५० रुपयांचा दर मिळतो. उन्हाळ्यातील दोन महिनेच हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध असतो.
रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे हा कांदा प्रसिद्ध आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या इतर कांद्याच्या तुलनेत का कांदा कमी तिखट असतो. त्यामुळेही त्याची मागणी अधिक आहे. जिल्ह्यात एकरी २४ क्विंटल एवढे उत्पादन घेतले जाते. दीडशे वर्षाहून अधिक काळापासून येथील शेतकरी या कांद्याची लागवड करत आले आहेत. कोकणात इतर ठिकाणी या पांढरा कांदा लागवडीचे प्रयोग फारसे यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे अलिबागमधील मातीच्या गुणधर्मामुळे या कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे होत असल्याचे दिसून येत आहे.
गेली चार वर्ष या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. अखेर २९ सप्टेंबरला या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वत:ची ओळख मिळणार आहे.
भौगौलिक मानांकन मिळाल्यानंतर आता पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढीसाठी त्यासाठी शेतीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे. सेंद्रीय पद्धतीने उत्पादकता कशी वाढवता येईल यासाठीही अभ्यास करावा लागणार आहे. बरेचदा गुजरात आणि इतर जिल्ह्यांत उत्पादित होणारा कांदा हा अलिबागच्या नावाने विकला जातो. ही फसवणूक कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कांद्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. यासाठी कृषी विभागाने सहकार्य करावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
औषधी गुणधर्म
पांढरा कांद्याला औषधी गुणधर्म आहे. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते तसेच हृद्याच्या तक्रारींपासूनही दुर ठेवते. रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दुर होते. यामुळे अॅनिमियाही दुर होतो असे जाणकार सांगतात. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताजा कांद्याचा रस गुळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्सुलिन निर्माण होते.
कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने आमचा हुरूप वाढला आहे. आता कांद्याची उत्पादकता आणि उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. कृषी विभागाने कांद्याच्या विपणनासाठी सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे. -सचिन पाटील, अध्यक्ष पांढरा कांदा
उत्पादक संघ
या वर्षी पांढरा कांदा लागवडीचे क्षेत्र किमान २५ एकरने वाढावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. -उज्ज्वला बाणखेले, कृषी अधिक्षक रायगड</strong>