|| दिगंबर शिंदे
सगळीकडे दिवाळीची धामधुम सुरू होती, पण खानापूरच्या तांदळगावात चव्हाण कुटुंबात नव्याने आलेल्या पाहुण्याचे स्वागत करतांना डोळ्यात आसवांचा पूर दाटला होता. जन्मलेल्या बाळाच्या शरीरात गुंतागुंत होती. शस्त्रक्रियेसाठी ४८ तासांचे हे बाळ घेऊन गरीब दाम्पत्य सांगली-कोल्हापुरात रुग्णालयांच्या दारोदारी फिरत होते. त्यांची वणवण पाहून एका व्यक्तीने ‘समाजमाध्यमा’वर मदतीचे आवाहन केले. अन् त्यातून बाळाची जीवनावश्यक शस्त्रक्रिया सोपी झाली. समाज माध्यमांची उपकारकता यानिमित्ताने समोर आली.
तांदळगावातील रहिवासी आनंदा चव्हाण यांच्या पत्नीची पलूसच्या आरोग्य केंद्रामध्ये ४ नोव्हेंबर रोजी प्रसूती झाली. नवजात अर्भक जन्माला आल्याचा आनंद व्यक्त करीत असतानाच या अर्भकांला गुदद्वारच नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी या कुटुंबाला सांगलीच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. पण जिल्हा रूग्णालयाने लगोलग शस्त्रक्रिया करण्याबाबत हतबलता दर्शविली आणि संबंधित दाम्पत्याला कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात पाठविले. हे बाळ घेऊन हे दाम्पत्य कोल्हापूरला धावले. मात्र तिथे पोहोचल्यावर देखील शत्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने १५ दिवस थांबावे लागेल असे त्यांना सांगण्यात आले. उपचार तर तात्काळ होणे गरजेचे होते, अन्यथा बाळाच्या जिवाला धोका होता. सरकारी रुग्णालयांचा पर्याय संपल्यावर अखेर या दाम्पत्याने सांगली-कोल्हापुरातील खासगी रुग्णालयांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली. पण बहुतेक ठिकाणी एकतर शस्त्रक्रियेसाठी पन्नास हजार ते एक लाखांपर्यंतचा खर्च मागितला. तर काहींनी तातडीने शस्त्रक्रियेसाठी नकारच कळवला. पदरी सर्वत्र निराशा आल्यावर हे दु:खी दाम्पत्य पुन्हा पलूसच्या आरोग्य उपकेंद्रात परतले. तिथेच आपली व्यथा मांडताना त्यांच्या डोळय़ांतून वाहणारी आसवे कुणीतरी पाहली आणि हे सारे दु:ख त्याने ‘समाजमाध्यमा’वर तपशिलासह मांडले.
हा संदेश पाहता पाहता काही वेळातच सर्वत्र फिरू लागला. प्रत्येक जण आपल्या परीने मदतीच्या सूचना करू लागले. या दरम्यानच कुणीतरी हा संदेश सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनी तत्काळ पलूसचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या आणि त्याच रात्री दोन दिवसाच्या अर्भकाला रूग्णवाहिकेतून सांगलीला हलविण्यात आले. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली, बाळ धोक्याच्या बाहेर आले आणि चव्हाण कुटुंबाच्या अश्रूंची फुले झाली. अजूनही या अर्भकावर तीन शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत, त्या सर्व मोफत करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
झाले काय?
जन्मलेल्या बाळाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असताना खानापूरमधील दाम्पत्यासमोर आर्थिक अडचणी होत्या. त्यातच जिल्हा रुग्णालयाने शस्त्रक्रियेस असमर्थता दर्शवल्यानंतर पोटच्या पोराला जगविण्यासाठी हे दाम्पत्य रुग्णालयांकडे मदतीची याचना करीत होते. त्यांच्या दु:खाची ही कहाणी समाजमाध्यमांवर पाहिल्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले आणि बाळाचे प्राण वाचले.