राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण न दिल्यामुळे केंद्र सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये मराठा समाजाला लाभ मिळणार नाही. आघाडी सरकारने या समाजाची दिशाभूल केली. अर्धी लढाई जिंकली असली, तरी पूर्ण लढाई जिंकण्यास मराठा समाजाने सज्ज राहावे, असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केले.
पाथरी येथे मराठा समाजाच्या वतीने मेटे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विजय सीताफळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना नखाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र धम्रे, प्रभाकर िशदे आदी उपस्थित होते. मेटे म्हणाले, की मराठा समाजातील पुढाऱ्यांनी स्वत:चा राजकीय स्वार्थ पाहिला. त्यांनी स्वत:च्याच मुलाबाळांना मोठे केले. समाजाला मात्र वाऱ्यावर सोडले. मराठा समाजाला दिशा देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेते लाभले नसल्याने या समाजाची अवस्था दयनीय झाली. मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची वेगळीच जात निर्माण झाली. तेच मराठा समाजाच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत आहेत. अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षणाची अर्धीच लढाई जिंकली असून केंद्र सरकारचा लाभ मिळण्यासाठी ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी आपण कायम लढा देऊ, असेही मेटे यांनी सांगितले. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्याम रणेर यांनी सूत्रसंचालन केले. शिवसंग्रामचे दत्ता बुलंगे यांनी प्रास्ताविक केले. अच्युतराव आहेरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अण्णासाहेब जाधव, अॅड. ज्ञानेश्वर मगर, बाबासाहेब भाले, वसंतराव गायकवाड, हरिभाऊ वाकणकर, आसाराम भाळसत्रे आदींनी परिश्रम घेतले.

Story img Loader