करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर जवळपास दीड वर्षांहून अधिक काळानंतर राज्यभरातील सर्व शाळा सोमवारपासून (४ ऑक्टोबर) पुन्हा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, यावरून आता विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उठा उठा शाळा चालू झाली आता मंत्रालयात सुद्धा जायची वेळ झाली”, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा करोना काळात मंत्रालयात न जाता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे सातत्याने भाजपा आणि मनसेने बोचऱ्या टीका केल्या आहेत.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडतच नाहीत”, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून झाली आहे. त्यावर वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे. “घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल”, असं मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. तर, यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकदा मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली होती. “मुख्यमंत्र्यांनी एकाच ठिकाणी बसून काम पाहिलं पाहिजे. त्यांनी एकाच ठिकाणी बसून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे”, असं शरद पवार म्हणाले होते.
“पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री” – राणे
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना सुनावलं होतं. “मुख्यमंत्री स्वतः घराबाहेर पडत नाही आणि दुसऱ्यांवर टीका करतात”, असं फडणवीस म्हणाले होते. तर “घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला. हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात”, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला होता.