मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधून आपणच नगर जिल्हय़ाच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार बबनराव घोलप यांनी केले. शिवसेना व साईबाबांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण येथे आलो असे ते म्हणाले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी घोलप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते सोमवारी सायंकाळी शिर्डीत आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. संपर्कप्रमुख सुहास सामंत, आमदार अनिल राठोड, उपनेते रवींद्र नेर्लेकर, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, रिपाइंचे नेते विजय वाकचौरे आदी मोठय़ा या वेळी उपस्थित होते.
घोलप म्हणाले, गेल्या वेळी भाऊसाहेब वाकचौरेंना शिवसेवेची उमेदवारी व युतीच्या राजवटीत राधाकृष्ण विखे यांना कृषिमंत्रिपद माझ्यामुळेच मिळाले होते. या दोघांनीही शिवसेनेशी व शिवसेना पक्षप्रमुखांशी गद्दारी केली आहे. या गोष्टीचे शल्य मनात आहे. त्याचे प्रायश्चित्त त्यांचा पराभव करून घ्यायचे असल्याने मी येथे आलो.
जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सुहास सामंत म्हणाले, ज्याने शिवसेनेला व साईबाबांना फसविले त्याला धडा शिकवायाचा आहे हा राग मनात ठेवा. राधाकृष्ण विखेंना स्वत:चा नाश करून घ्यायचा असल्याने त्यांनी वाकचौरेंना मिठी मारली. राठोड, नाशिक जिल्हा उपनेते रवींद्र नेर्लेकर, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख कमलाकर कोते, शिवाजी ठाकरे, मच्छिंद्र धुमाळ, रिपाइंचे नेते विजय वाकचौरे, विजय तळपाडे यांची भाषणे झाली. अभय शेळके यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा