शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल असा विश्वास व्यक्त करतानाच घोलप यांच्याकडे हा पैसा आला कोठून, त्यांचे उत्पन्नाचे मार्ग काय आहेत याची चौकशी करून त्यांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी राळेगणसिद्घीत पत्रकारांशी बोलताना केली. न्यायालयाच्या निकालाविषयी समाधान व्यक्त करून अशा भ्रष्टाचारी माणसाला शिवसेना उमेदवारी देणार का असा सवालही त्यांनी केला.
हजारे म्हणाले, न्यायालयाने घोलप यांना योग्य शिक्षा दिली आहे. आमच्याकडे अनेक पुरावे होते. न्यायालयाने ते सर्व तपासून निर्णय दिला. खरा दोष राजकीय पक्षांचा आहे. आम्ही शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्घव ठाकरे यांच्याकडे सर्व पुरावे पाठवून अशा लोकांना उमेदवारी देणे गैर असल्याचे सूचित केले होते. भ्रष्ट लोकांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणून त्यांना लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पाठविणे योग्य नाही. जेथून देशाची जडणघडण होते, तेथून देशाचे चित्र बदलायचे असते, तेथे तुम्ही असे लोक पाठविले तर तुमच्यासमोर देशाचे, समाजाचे काय ध्येयधोरण राहील असा सवाल त्यांनी केला. केवळ सत्ता मिळाली पाहिजे या एकमेव उद्देशाने उमेदवारी दिली जाते. मग तो भ्रष्टाचारी, गुंड, व्यभिचारी असला तरी चालेल, या वृत्तीमुळेच देशात भ्रष्टाचार वाढला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरणार आहे याची आठवण करून दिली असता हजारे म्हणाले, घोलप यांच्या भ्रष्टाचाराविषयी पक्षप्रमुखांना पत्र पाठविले होते. परंतु त्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. उलट बारा वर्षांपूर्वी त्यांनीच मला तुरुंगात पाठविले होते. बबनराव घोलपांनी माझ्याविरोधात बदनामी, बेअब्रूचा खटला दाखल केला होता. छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेणाऱ्या शिवसेनेने घोलप यांना उमेदवारीच द्यायला नको होती. याच प्रकरणामुळे त्यांचे सरकार सत्तेवरून गेले होते.
न्यायाधीशांनाही लाचेचा प्रयत्न
हे प्रकरण दडपण्यासाठी घोलप यांनी न्यायाधीशास लाच देऊन आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे हजारे यांनी सांगितले. या न्यायाधीशाला फ्लॅट देऊ करण्यात आला होता. तो मंजूरही झाला होता. परंतु आपले आंदोलन पुन्हा सुरू झाल्यानंतर घाबरून न्यायाधीशांनी फ्लॅट नाकारला. तरीही त्या न्यायाधीशांना घरी जावे लागले, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत असे हजारे म्हणाले.
घोलप यांची बेहिशोबी संपत्ती जप्त करावी- हजारे
शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल असा विश्वास व्यक्त करतानाच घोलप यांच्याकडे हा पैसा आला कोठून, त्यांचे उत्पन्नाचे मार्ग काय आहेत याची चौकशी करून त्यांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी राळेगणसिद्घीत पत्रकारांशी बोलताना केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-03-2014 at 04:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gholaps non calculating assets should be seized hazare