नितीन बोंबाडे
दोन वर्षांत चार लाख झाडांची तोड; मिरची, आंबा पिकाकडे बागायतदारांचा कल
* डहाणू तालुक्यात साडेपाच हजार हेक्टरवर चिकूबागा, २००० चिकू बागायतदार
* वाणगावमध्ये अनेक चिकू बागा नष्ट, चिकू बागायतदारांचा पर्यायी शेतीकडे ओढा
चिकूसाठी प्रसिद्ध असणाऱ्या घोलवड-बोर्डी परिसरातील बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती, रोगराई यामुळे चिकू उत्पादन घटत असल्याने बागायतदारांनी चिकूची चार लाख झाडे तोडली असून त्याजागी मिरची, आंबा लागवडीचा पर्याय स्वीकारला आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा परिणाम चिकू बागांवर झाला असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.
डहाणू येथे नुकत्याच झालेल्या चिकू बागायतदारांच्या सभेत चिकूबाबतची वस्तुस्थिती उजेडात आली. वातावरणातील बदल, अतिवृष्टीसह अन्य नैसर्गिक आपत्ती, प्रदूषण, पिकांवर येणारे रोग यांसारख्या कारणांमुळे चिकूच्या फळावर दुष्परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंदाच्या खरीप हंगामात चिकू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत चिकू उत्पादन फारसे येणार नाही. चिकूची उत्पादन क्षमता १५ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. सरकारने पीक विम्यापोटी दिलेली प्रति हेक्टर १८ हजार भरपाई तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
डहाणू तालुक्यात साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रात २००० चिकू बागायतदार आहेत. मात्र घटत्या उत्पादनामुळे गेल्या दोन वर्षांत चिकू उत्पादकांनी अन्य पीक घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक बागायतदार मिरची आणि आंबा या पिकांकडे वळले आहेत. दोन वर्षांत चिकूच्या चार लाख झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील वाणगाव भागामध्ये अनेक चिकू बागा नष्ट करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यामध्ये फारसे उत्पन्न मिळत नसले तरी या तडजोड करून बागा टिकवून ठेवल्या आहेत. चिकू बागांकडे वर्षभर लक्ष द्यावे लागते. मजुरी, पाणी नियोजन आणि अन्य खर्च मिळून बागायतदारांना ७० हजार रुपयांचा खर्च सोसावा लागत आहे. उत्पादन घटत असल्याने व्यावसायिकदृष्टय़ा चिकू बागा टिकवणे कठीण आहे.
– प्रीत पाटील, चिकू बागायतदार, बोर्डी
चिकू संशोधन केंद्राची आवश्यकता
औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा परिणाम चिकू बागांवर झाला आहे. या प्रकल्पामुळे वातावरणात राख पसरते. फेब्रुवारी ते जूनमध्ये वाऱ्याची दिशा बदलते आणि या राखेचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी, चिकूच्या झाडांची उत्पादन क्षमता घटते, असे बागायतदार प्रकाश अभ्यंकर यांनी सांगितले. झाडांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. डहाणू तालुक्यातील प्रदूषण रोखण्याचे आव्हान सरकारी यंत्रणांसमोर आहे. सरकारने चिकू संशोधन केंद्र स्थापन केल्यास चिकूचे पीक घटण्याची कारणे शोधता येतील. त्याचा उपयोग चिकू बागा आणि पूरक व्यवसाय टिकवण्यासाठी होऊ शकतो. विशेष म्हणजे हे संशोधन केंद्र कोसबाड येथे मंजूर करावे, अशी बागायतदारांची मागणी आहे.
भौगोलिक मानांकनावर परिणाम : बागायतदार अन्य पिकांकडे वळत असल्याने चिकू बागा टिकवण्याचे आव्हान सरकारी यंत्रणांसमोरही आहे. चिकू बागांअभावी भौगोलिक मानांकन टिकवण्याचेही आव्हान आहे. घोलवड, बोर्डीच्या चिकूला भौगोलिक मानांकन असले तरी फळाची गुणवत्ता आणि दर्जा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. चिकूची गुणवत्ता चांगली नसेल तर भौगोलिक मानांकनावरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर चिकूच्या बागा, चिकूची प्रतवारी आणि गुणवत्ता असेल तरच या ब्रॅण्डचे बाजारमूल्य टिकून राहते. चिकूची गुणवत्ता आणि प्रतवारी सरस नसेल तर भौगोलिक मानांकन असूनही त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे चिकू बागातदारांचे म्हणणे आहे.